Mhaswad Accident News 
सातारा

Mhaswad Accident : मदतीसाठी हात सरसावले पण मृत्यूने गाठले

जखमी सागरची मृत्यूशी झुंज व्यर्थ : धुळदेवसह माण तालुका हळहळला

पुढारी वृत्तसेवा

म्हसवड : पुणे-पंढरपूर महामार्गावरील बरड गावाजवळ अचानक समोर आलेल्या टेम्पोमुळे भीषण अपघात झाला होता. या अपघातातील धुळदेव, ता. माण येथील सागर प्रकाश रुपनवर (वय 24) या जखमीची गेल्या दहा दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज व्यर्थ ठरली. मदतीसाठी अनेक हात सरसावले होते. मात्र, तरीही सागरला मृत्यूने गाठलेच. या घटनेने संपूर्ण तालुका आणि सोशल मीडियावरुन शोक व्यक्त होत आहे.

अत्यंत गरीब व कष्टकरी कुटुंबातील सागर आणि त्याचा मोठा भाऊ पंकज रुपनवर हे दोघेही पुण्यात नोकरीस होते. पंकज हे पोलिस दलात कार्यरत असून, सागर खासगी कंपनीत नोकरी करत होता. आई-वडिलांच्या कष्टातून उभं राहिलेलं कुटुंब आता स्थिरावत असतानाच नियतीने घाला घातला. दरवर्षीप्रमाणे धुळोबा देवाच्या यात्रेसाठी दोघे भाऊ पुण्यातून बुलेटवरून गावाकडे निघाले होते. मात्र पुणे-पंढरपूर महामार्गावरील बरड गावाजवळ अचानक समोर आलेल्या टेम्पोमुळे भीषण अपघात झाला. या अपघातात दोघेही जखमी झाले. त्यांना तात्काळ फलटण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंकज यांची प्रकृती स्थिर होती, मात्र सागर गंभीर जखमी झाला होता. त्याचा एक पाय आणि एक हात मोडला होता, तसेच छातीवर झालेल्या जबर मारामुळे फुफ्फुस व हृदयाला गंभीर इजा झाली होती. डॉक्टरांनी तातडीने खर्चिक उपचारांची गरज असल्याचे सांगितले. घटनेची माहिती समजताच गावकरी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी धाव घेतली. सोशल मीडियावरून मदतीचे आवाहन करण्यात आले आणि पाहता पाहता मदतीचा अक्षरशः महासागर उसळला. हजारो हात सागरच्या मदतीसाठी पुढे आले. कुटुंब, गावकरी आणि मित्रपरिवार जीव तोडून प्रयत्न करत होते.

तब्बल दहा दिवस सागर मृत्यूशी झुंज देत होता. अखेर दि. 14 एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. सागर वाचावा या एकाच आशेवर डोळे लावून बसलेल्या कुटुंबीयांसह संपूर्ण तालुक्याचा आशेचा किरण क्षणात हरपला. सागरच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ पंकज, आजी, चुलते, चुलत भाऊ असा परिवार आहे. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT