महाबळेश्वर : मेटगुताड, ता. महाबळेश्वर येथे भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी दुपारी भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला करत तब्बल सात मुलांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. जखमी मुलांचे वय 2 ते 13 वर्षांच्या दरम्यान आहे. या सर्व मुलांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
जखमींमध्ये शंकर दत्तात्रय ढेबे (वय 10), प्रथमेश पांडुरंग कात्रट (वय 13), शार्वी सचिन बावळेकर (वय 2), श्रुती यशवंत लांगी (वय 4), अर्णव विशाल बावळेकर (वय 9), सार्थक अनिल हिरवे (वय 11) आणि मयंक शरद शिंदे (वय 9) यांचा समावेश आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्याने मुले रक्तबंबाळ झाली. मागील आठवड्यापासून या परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या असून आतापर्यंत एकूण 10 मुलांवर हल्ला झाल्याची माहिती महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
शुक्रवारी काही मुले ग्रामपंचायत इमारतीनजीक असलेल्या बसथांब्याजवळ उभी असताना भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर थेट हल्ला केला. या हल्ल्यात मुलांच्या हात-पायांना चावे घेतले. मुलांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत कुत्र्याला हुसकावून लावले. सुदैवाने सर्व मुले किरकोळ जखमी झाली. दरम्यान, मेटगुताड व परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सकाळ-संध्याकाळ फिरणाऱ्या नागरिकांना तसेच शाळकरी मुलांना याचा धोका निर्माण झाला आहे.
मेटगुताड ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांचे लसीकरण, निर्बंध आणि पुनर्वसन यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. तसेच महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालय प्रशासनानेही ग्रामपंचायतीला पत्र देऊन परिसरातील पिसाळलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची सूचना केली आहे.