खंडाळा : हिंजवडी येथे सापडलेल्या ११ लाख ५५ हजार ५०० रुपयांच्या एमडी ड्रग्जचे खंडाळा कनेक्शन पोलीस तपासात उघड झाले आहे. यामध्ये खंडाळ्यातील गुन्हा दाखल झालेल्या दोन संशयितांच्या खंडाळ्यातील घरावर छापा टाकून ३ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. यामध्ये अहिरेचा माजी उपसरपंचाचीही उचलबांगडी करण्यात आली आहे. ड्रग्जचे धागेदोरे खंडाळ्यापर्यंत आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी मुख्य दोन संशयितांच्या तपासासाठी हिंजवडी अमली पदार्थ विरोधी पथकाची शोधमोहीम सुरू झाली आहे.
हिंजवडी येथील मुक्ताईनगर परिसरामध्ये दि. ११ रोजी एम.डी. ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन आलेल्या अक्षय प्रदीप धायगुडे (वय ३१), दयानंद उत्तम धायगुडे (वय ३८), महेश पुनाराम किचड ऊर्फ बिश्नोई (वय २१, सर्व रा. अहिरे, ता. खंडाळा) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६१.७० ग्रॅम एमडी ड्रग्ज, एक चारचाकी व तीन मोबाईल असा एकूण ११ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे केलेल्या चौकशीत अशपाक ऊर्फ मोन्या काझी (रा.अहिरे, ता. खंडाळा) व हनुमान किलेरी ऊर्फ बिश्नोई (रा. खंडाळा) या दोघांची नावे समोर आली.
याप्रकरणी पोलीस पुढील तपासासाठी खंडाळ्यातील त्यांच्या ठिकाणावर आले असता संशयितांच्या रूममधून आणखी २ लाख ८४ हजार ४०० रुपये किमतीचा २८.४४ ग्रॅम एमडी ड्रग्जचा साठा पोलिसांनी जप्त केला. या कारवाईनंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अक्षय प्रदीप धायगुडे, दयानंद उत्तम धायगुडे, महेश पुनाराम किचड ऊर्फ बिश्नोई, अशपाक ऊर्फ मोन्या काझी (सर्व रा.अहिरे) व हनुमान किलेरी ऊर्फ बिश्नोई (रा.खंडाळा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ड्रग्जच्या साखळीत माजी उपसरपंचही
ज्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये दयानंद धायगुडे हा संशयित अहिरेचा माजी उपसरपंच व ग्रामपंचायतीचा विद्यमान सदस्य आहे. एमडी ड्रग्जच्या साखळीत गावचा लोकप्रतिनिधीच सापडल्याने गावाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. राजकीय व्यक्तीच ड्रग्ज माफिया बनल्याने तालुक्याच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे.