मायणी : मे महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात परिसरामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने खटाव तालुक्यातील मायणी येथील ब्रिटिशकालीन तलाव जूनच्या दुसर्याच आठवड्यात पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलाव भरल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवर्षी परिसरातील शेतकरी वर्गाला परतीच्या पावसाची वाट पाहावी लागते. हा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात होतो. त्यावेळी परिसरातील ओढे, नाले, लहान-मोठे बंधारे भरून वाहू लागतात. यावर्षी मात्र मे महिन्याच्या दुसर्याच पंधरवड्यात उन्हाळी पाऊस तसेच अवकाळी पावसाने या भागाला अक्षरश: झोडपून काढले. मायणी पूर्व, दक्षिण भागात असणार्या कलेढोण, पाचवड, मुळकवाडी, गारळेवाडी, गारुडी, तरसवाडी, कानकात्रे व विखळे भागांमध्येही मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे या भागातील लहान मोठे तलाव नालाबांध पूर्ण क्षमतेने भरले. तसेच ओढ्यानाल्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने मायणी येथील ब्रिटिशकालीन तलाव जून महिन्यातच भरल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने तलावाच्या पश्चिम बाजूने वाहणार्या चांद नदी पात्रातील मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने या नदीवर असणारे लहान मोठे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे खरीप हंगामा बरोबर रब्बी हंगामामधील पिकांनाही या पाण्याचा फायदा होणार आहे. तसेच मायणी तलाव भरला असला तरी 1972 च्या दुष्काळात मायणीच्या उत्तर भागात बांधलेला कानकात्रे (विठ्ठल नगर) येथील तलाव आजही कोरडा आहे. त्यामुळे हा तलाव कधी भरणार याकडे या भागातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.