लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवार, दि. 26 रोजी दुपारी दोनच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील चार मुक्कामांसाठी आगमन होत आहे. माऊलींच्या स्वागताची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. माऊलींचे जिल्ह्यात आगमन होण्यापूर्वी निरा नदीच्या पात्रात पाडेगाव बाजूच्या तीरावर श्री दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना निरा स्नान घालण्यात येणार आहे. निरा स्नानासाठी वीर धरणातून निरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे दत्त घाटावर निरा नदीच्या पात्रात पाणी पातळीत वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळपर्यंत नीरा दत्त घाटावरील पाणी कमी होईल व आणि माऊलींच्या पादुकांना अभ्यंगस्नान सुरळीतपणे पार पडेल अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत करण्यासाठी पाडेगाव (ता. खंडाळा) येथे पालकमंत्री शंभूराज देसाई , ना. जयकुमार गोरे, ना. मकरंद पाटील, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार अजित पाटील, पोलिस उपअधिक्षक राहुल धस, गटविकास अधिकारी अनिलकुमार वाघमारे, सपोनि सुशील भोसले, नायब तहसिलदार हेमंत कामत, नायब तहसिलदार स्वप्निल खोल्लम, नितीन भरगुडे - पाटील, दत्तानाना ढमाळ, आनंदराव शेळके - पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
माऊलींचा पालखी सोहळा निरा येथून दुपारी दीडच्या सुमारास प्रस्थान ठेवल्यानंतर निरा नदीवरील जुन्या पुलावरून पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल. निरा नदीच्या पाडेगाव तिरावर माऊलींचा रथ थांबल्यावर माऊलींच्या पादुकांना निरा नदीत निरा स्नान घालण्यासाठी नेण्यात येतील. प्रशासनाच्यावतीने दत्त घाटावर पादुका नेण्यासाठी नवीन कॉक्रींटचा रस्ता व बॅरिकेट लावण्यात आले आहे तर ज्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांना अभ्यंग स्नान घालणार आहे. त्या ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त व कमांडो यांची नेमणूक करण्यात आली आहे. दत्त घाटावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्स ,शिरवळ रेस्क्यू टीम ,सर्पमित्र यांना पाचारण करण्यात आले आहे.
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे निरा नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे निरा स्नानासाठी दत्त घाटावर पाणी आले होते. आळंदीपासून निघालेल्या वारकर्यांना निरा नदीत चांगल्या प्रकारे आंघोळ व कपडे धुण्याची सोय होत असते. माऊलींचे सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पाडेगावच्या हद्दीत जिल्ह्याच्यावतीने पदाधिकारी व अधिकारी स्वागत करणार आहेत. या ठिकाणी गर्दी गोंधळ होऊ नये म्हणून पोलीसांचे वतीने दोरी लाऊन कडे करण्यात येणार आहे .
माऊलीच्या स्वागतासाठी सातारा जिल्हयाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून माऊलीच्या आगमणाची प्रतिक्षा लागली आहे. दरम्यान, माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पाडेगाव ते लोणंद हे सुमारे सात किलोमीटर अंतर पार करून माऊलींचा पालखी सोहळा साधारणतः पाचच्या सुमारास लोणंदनगरीत प्रवेश करेल. त्यानंतर माऊलींची पालखी बाजार तळावरील पालखीतळावर नेण्यात येईल. या ठिकाणी समाज आरती नंतर माऊली एका दिवसाच्या मुक्कामासाठी लोणंद नगरीत विसावेल. माऊलींच्या स्वागतासाठी लोणंदनगरी सज्ज झघली आहे.