कराड : पत्नीस मारहाण केल्यानंतर याबाबत विचारणा केल्याच्या रागातूनच संशयित भाचा डाबर सर्जेराव पळसे याने मामा शेखर उर्फ बाळू सूर्यवंशी याला संपविल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. दरम्यान, संशयित पळसे याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिला आहे.
संशयित पळसे याने बुधवारी स्वतःच्या पत्नीस मारहाण केली होती. त्यानंतर याबाबत मामा शेखर उर्फ बाळू याने त्याला विचारणा केली. ही विचारणा केल्याचा राग मनात धरून संशयित भाच्याने मामा सूर्यवंशीवर चाकूने हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीची सत्यता पडताळण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी यांनी दिली आहे. दरम्यान, गुरूवारी रात्री गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच शुक्रवारी कायदेशीर सोपस्कर पार पाडल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.