सातारा : दहावी-बारावीनंतर करिअरबाबत एकाच छताखाली मार्गदर्शन उपलब्ध करून देणार्या दै.‘पुढारी’ एज्यु-दिशा शैक्षणिक प्रदर्शनास शनिवारी उदंड प्रतिसाद लाभला. राज्यभरातून आलेल्या विविध शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलवर जाऊन विद्यार्थी, पालकांनी बदलते नवीन शैक्षणिक पर्याय व रोजगाराच्या संधीबाबतच्या प्रश्नांचे निरसन करून घेतले.
विद्यार्थी व पालकांच्या तुडुंब गर्दीत पोलिस करमणूक केंद्र हरवून गेले आहे. या प्रदर्शनाचा रविवारी (दि. 1 जून) समारोप होत आहे. दरम्यान, करिअरच्या नवीन वाटा शोधण्याची या प्रदर्शनातील अखेरची संधी विद्यार्थ्यांना आज मिळणार आहे. राजपथावरील पोलिस करमणूक केंद्रात दै.‘पुढारी’च्या वतीने एज्यु-दिशा शैक्षणिक प्रदर्शन सुरू आहे. संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर हे मुख्य प्रायोजक असून विश्वकर्मा युनिव्हर्सिटी पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत.
प्रदर्शनात अभियांत्रिकी, वैद्यकीय, अॅग्रीकल्चर यासह पारंपारिक अभ्यासक्रमांचे शिक्षण देणार्या नामांकित शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या आहेत. पहिल्या दिवसापासून प्रदर्शनास गर्दी पहायला मिळाली. शनिवारी सुट्टीचा दिवस होता. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी सकाळपासूनच प्रदर्शनाच्या ठिकाणी येण्यास सुरुवात केली. प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलवर जाऊन विद्यार्थी, पालकांनी चांगले महाविद्यालय, विद्यापीठ, नवीन कोर्सेस, त्यासाठीची शैक्षणिक फी, वसतिगृह सुविधा, शिष्यवृत्ती, आवश्यक कागदपत्रे, परदेशी शिक्षण, रोजगाराच्या संधीबाबत माहिती घेतली. एकाच छताखाली करिअर व शैक्षणिक संस्थांची सर्व इत्थंभूत माहिती मिळाल्याने विद्यार्थी, पालकांनी मनातील संभ्रम दूर झाल्याची भावना व्यक्त केली.