सातारा : ‘लगीन होण्याआधी या ड्रायव्हरला जानू भेटून जा’, हे गाणे फेमस असले तरी लग्न झाल्यावरही प्रियकरासाठी पागल होऊन पळून जाणार्या विवाहित स्त्री-पुरुषांची संख्या वाढत असल्याची खळबळजनक बाब सातारा जिल्ह्यात समोर आली आहे. दरवर्षी सरासरी 1200 विवाहित महिला पळून जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. भानगडी वाढू लागल्याने शिवथरसारख्या घटनेतून ‘अ’नैतिकता रक्तरंजित होऊ लागल्याचे वास्तव पहायला मिळत आहे. अनैतिक संबंधाच्या संतापजनक आकडेवारीने जनमाणस सुन्न झाले आहे.
सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या आहेत. यातून पतीचे परस्त्रीशी तर पत्नीचे परपुरुषाशी संबंध वाढत आहेत. त्यातून गुन्हेगारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. अगदी खुनापर्यंत याचे पर्यावसन होत आहे. यामुळे सामाजिक चिंता वाढू लागली आहे. पोलिस रेकॉर्डनुसार सातारा जिल्ह्यात दरवर्षाला सरासरी 1200 महिला बेपत्ता होत आहेत. यामध्ये सासरचा छळ हे कारणही असून दुसर्या क्रमांकावर विवाहित असतानाही परपुरुषासोबत पळून जाण्याचे प्रमाण धक्कादायकरित्या वाढू लागले आहे. महिला बेपत्ता झाल्यानंतर पोलिस, कुटुंबिय शोध घेत आहेत.
मात्र, सापडणार्या महिलांचे संसार टिकत नसल्याचे विदारक सत्य समोर येत आहे. पळून गेलेल्या विवाहितांपैकी सरासरी वर्षाला 250 महिला सापडत आहेत. मात्र, त्यानंतरही त्या परपुरुषासोबतच जाणे पसंत करत आहेत. यामुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात आली आहे. हे घडू नये, टाळले जावे यासाठी पती-पत्नीच्या नात्यामध्ये प्रत्येकाने आपला वेळ एकमेकांना शेअर करणे क्रमप्राप्त बनले आहे. पती-पत्नीच्या पळून जाण्याने त्यांच्या मुलांवर गंभीर परिणाम होत असल्याचेही विदारक चित्र आहे.
दरवर्षी एप्रिल महिन्यात 9, 10, 12 वीच्या परीक्षा झाल्या की मुली पळून जाण्याचे प्रमाण अधिक राहते. ज्यांना कायद्याचे ज्ञान आहे ते 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पळून जातात. मात्र, ज्यांना घाई झालेली असते ते परीक्षा झाल्यानंतर पळून जातात व कायद्याच्या कचाट्यात मुले, युवक अडकतात. यामुळे करिअरचे अनेकांचे वांदे होतात. वर्षभरात जेवढे पळून जातात त्यातील 40 टक्के पळून जाण्याचे प्रमाण हे एप्रिल महिन्यातील असते.