विठ्ठल हेंद्रे
सातारा : साताऱ्यात पार पडलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करावा, यासह 17 ठराव मांडून मंजूर करण्यात आले.संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात बेळगाव सीमा भागातील प्रश्नावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने निदर्शने केली. सीमाप्रश्नावर महाराष्ट्र शासनाने ठोस भूमिका घ्यावी, तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या दाव्याबाबत तातडीने पुढील रणनीती आखावी, या मागण्यांसाठी आंदोलकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण झाले होते.
साताऱ्यात संमेलन सुरु असताना समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मलोजी अश्तेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पदाधिकारी यांनी बॅनर व हातात झेंडा घेवून आक्रमकपणे भूमिका मांडली. कर्नाटक सरकार सीमाप्रश्नावर आक्रमक भूमिका घेत असताना, महाराष्ट्र शासन निष्क्रीय असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. यामुळे काही काळ तणाव देखील झाला. आंदोलनकरत्यांनी अनेक सवाल यावेळी उपस्थित केले. उच्चाधिकार समितीची बैठक न घेणे, साक्षीदारांची तयारी न करणे आणि न्यायालयीन लढाईत विलंब होत असल्याने हे प्रश्न तातडीने सोडवले जावेत. अन्यथा सीमा भागात आंदोलन तीव्र करू, असा इशाराही समितीने दिला.
भौगोलिक सलगता, लोकेच्छेचा केंद्राने आदर करावा
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील 865 गावांमधील 25 ते 30 लाख मराठी भाषिक गेली 69 वर्षे लोकशाही मार्गाने महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढा देत आहेत. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून केंद्र सरकारने भौगोलिक सलगता, लोकेच्छा व भाषिक निकषांवर सीमाभाग तातडीने महाराष्ट्रात सामील करावा, अशी मागणी करण्यात आली.
शहाजी महाराजांचे होदगेरेत भव्य स्मारक उभारावे
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील श्री शहाजी महाराजांची बंगळूरु ही जहागिरी होती. शहाजी महाराजांची समाधी कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील होदगेरे येथे असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून शहाजी महाराजांच्या समाधीस्थळी ऐतिहासिक भव्य स्मारक उभारण्यासाठी शिफारस करावी, असा ऐतिहासिक ठरावदेखील साताऱ्यातील साहित्य संमेलनात मांडण्यात आला.