मनोज घोरपडे File Photo
सातारा

Manoj Ghorpade: कराड उत्तरेत मनोज घोरपडेंचा जलवा

बाळासाहेबांच्या शिलेदारांचे पानीपत : बालेकिल्ला आणखी भक्कम करण्यात यश

पुढारी वृत्तसेवा

सातारा : कराड उत्तर विधानसभा मतदार संघात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीतील 9 गटापैकी 6 जिल्हा परिषद गटात आ. मनोजदादा घोरपडे यांचा जलवा दिसला आहे. विशेष म्हणजे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मातब्बर व अनुभवी शिलेदारांचे पानीपत करत मनोजदादांनी उत्तरेचा आपला बालेकिल्ला भक्कम असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे उत्तरेतल्या घडलंय बिघडलंयची राज्यात चर्चा सुरू आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील कराड तालुक्यातील 5 पैकी 4 जिल्हा परिषद गटांवर भाजपने वर्चस्व मिळवले. जिल्हा परिषदेच्या उंब्रज गटातून रणजित जाधव, पाल गटातून मदन काळभोर, मसूरमधून लालासाहेब जगदाळे, सैदापूरमधून सागर शिवदास, पुसेसावळीमधून तेजस्विनी कदम यांनी यश प्राप्त केले. या यशात भाजपची एकत्रित रणनिती कारणीभूत ठरली. निवडणूक प्रमुख धैर्यशिल कदम यांच्या साथीने कराड उत्तरेचा बालेकिल्ला भाजपचे आमदार असलेल्या मनोजदादा घोरपडे यांनी आणखी मजबूत केला. सातारा तालुक्यातील नागठाणेमधून अजित साळुंखे यांनी विजय मिळवला. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या साथीने मनोजदादांनी हा गटही काबीज केला.

त्याबरोबरच पंचायत समिती गणांसाठी ही भाजपने आपली ताकद दाखवत अपशिंगे मि. गणातून मानसिंग मोरे, काशीळ गणातून सुषमा जाधव, चरेगाव गणातून धैर्यजा माने, वडोली निळेश्वर गणातून कोमल यादव, किवळ गणातून संतोष पाटील, वाघेरी गणातून अनिता वेताळ, हजारमाची गणातून प्रियांका पळसे व म्हासुर्णे गणातून प्रगती कोकाटे या गणांमध्ये विजय मिळवला आहे.

सह्याद्रि साखर कारखान्याच्या निवडणुकीत मनोजदादा घोरपडे बॅकफुटवर गेले होते. मात्र, नगरपालिकेच्या निवडणुका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मनोजदादा घोरपडे यांनी जोरदार कमबॅक केले. जिल्हा परिषदेच्या या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त फटका बसला तो माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना. बाळासाहेबांच्या राजकारणांना साथ देणाऱ्या मातब्बर सेनापतींचाच या निवडणुकीत पराभव झाला. या निवडणुकीत बाळासाहेब पाटील गटाला कराड उत्तरमध्ये जि.प.ची एकही जागा मिळू शकली नाही. त्यांच्या गटाच्या मसूरचे मानसिंगराव जगदाळे व पाली देवराज पाटील यांच्यासारख्या दिग्गज समर्थकांचा दारूण पराभव झाला.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाल गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व भाजपमध्ये झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचे उमेदवार माधवराव उर्फ मदनभाऊ काळभोर विजयी झाले. पाल गणात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रताप चव्हाण तर चरेगाव गणात भाजपच्या धैर्यजा माने विजयी झाल्याने पाल गटावर भाजपचा झेंडा फडकवण्यात आ. मनोज घोरपडे यांना यश आले. उंब्रज जिल्हा परिषद गटात बहुरंगी लढत झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व भाजप यांच्यामध्ये अत्यंत चुरस लागली होती. यामध्ये भाजपचे उमेदवार रणजित जाधव यांनी विजयश्री प्राप्त केली. उंब्रज जिल्हा परिषद गट भाजपकडे आला पाहिजे, असा चंग बांधून आ. मनोज घोरपडे यांनी स्वत: लक्ष घातले होते व शेवट त्यांची सरशी झाल्याचे दिसत आहे.

सैदापूर गटात मोठी चुरस पहायला मिळाली. भाजप उमेदवारांना अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागणार असे दिसत होते. मात्र, याठिकाणी गट व गणातील भाजपाचे उमेदवार विजयी झाले. या गटात मत विभागणीचा फायदा भाजप उमेदवारांना झाला. या गटात भाजपचे सागर शिवदास विजयी झाले तर यावेळी पहिल्यांदाच सैदापूर गण व हजारमाची गणात भाजपाचे दोन्ही उमेदवार निवडून आले. या गटातही राष्ट्रवादीसह काँग्रेस पिछाडीवर पडली आहे. बाळासाहेबांच्याच सेनापतींचाच पराभव झाल्याने मनोज घोरपडे यांचा कराड उत्तरेतला जलवा आणखी वाढला असून बालेकिल्ला मजबूत करण्यात मनोज घोरपडे यांना यश आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT