Navratri Festival : मांढरगडावर दर्शनासाठी भाविकांचा जनसागर 
सातारा

Navratri Festival : मांढरगडावर दर्शनासाठी भाविकांचा जनसागर

आठव्या माळेला लाखोंची उपस्थिती; वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुढारी वृत्तसेवा

मांढरदेव : महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव येथील श्री काळुबाई देवीच्या दर्शनासाठी रविवारी भाविकांचा जनसागर लोटला. नवरात्रोत्सवातील आठवी माळ आणि सार्वजनिक सुट्टी यांचा योग जुळून आल्याने पहाटेपासूनच मांढरगडावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात भाविकांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. मात्र, भाविकांची प्रचंड गर्दी, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि घाटमार्गावरील खराब रस्त्यांमुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

नवरात्रोत्सवात काळुबाई देवीच्या दर्शनाला महत्त्व आहे. त्यातच रविवारची सुट्टी आणि आठव्या माळेचा योग साधत राज्याच्या विविध भागांतून भाविकांनी मांढरगडाकडे धाव घेतली. पहाटेपासूनच खासगी वाहने, दुचाकी, चारचाकी तसेच अन्य प्रवासी वाहनांतून भाविक गडावर दाखल होत होते. जसजसा दिवस पुढे सरकत गेला, तसतशी गर्दी वाढत गेली. मंदिर परिसर आणि दर्शन मार्गावर भाविकांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. देवीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

भाविकांची संख्या वाढल्याने मांढरगडाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. मिळेल त्या वाहनाने देवीच्या दर्शनासाठी गड गाठण्याचा प्रयत्न भाविकांकडून सुरू होता. मात्र, एकाच वेळी मोठ्या संख्येने वाहने दाखल झाल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली. परिणामी, भाविकांना गडावर पोहोचण्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागला.

मांढरगडावर उपलब्ध असलेली पार्किंगची जागा भाविकांच्या वाहनांच्या तुलनेत अपुरी पडत असल्याचे चित्र दिसून आले. त्यातच वाहनतळावरील नियोजनाच्या अभावामुळे वाहनधारकांना जागा शोधण्यासाठी कसरत करावी लागत होती. काही ठिकाणी वाहने लावण्यासाठी जागा मिळवताना अडचणी निर्माण होत होत्या. वाहनांची वाढती संख्या आणि मर्यादित जागा यामुळे पार्किंगचा प्रश्‍न ऐरणीवर आला.

गडावर पोहचण्‍यापूर्वीच कोंडीचा सामना

वाई–मांढरदेवी तसेच भोर–मांढरदेवी घाटमार्गावरील खराब रस्त्यांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. घाटातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाहनांची मोठी संख्या यामुळे प्रवास अधिक किचकट झाला. देवीच्या दर्शनासाठी दूरवरून आलेल्या भाविकांना गडावर पोहोचण्यापूर्वीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नवरात्रोत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येत असताना घाटमार्गांची दुरुस्ती आणि वाहतूक नियोजनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. तळ्याजवळील सह्याद्री चौक तसेच मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहनांची कोंडी झाली होती. वाहनांच्या रांगा आणि भाविकांची वर्दळ यामुळे वाहतुकीवर ताण निर्माण झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT