Man Khatav water crisis: होरपळ वाढली; चार तलाव कोरडे ठाक Pudhari
सातारा

Man Khatav water crisis: होरपळ वाढली; चार तलाव कोरडे ठाक

माण -खटावमध्ये 11 प्रकल्पात 50 टक्क्यांवर पाणी : जनावरांचे हाल

पुढारी वृत्तसेवा
विलास आपटे

पुसेसावळी : होळीच्या सणानंतर लगेचच माण-खटाव तालुक्यात उष्णतेचा तीव्र प्रकोप वाढला असून, याचा थेट परिणाम शेती, पशुपालन आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत, तर शेतीसाठी आवश्यक ओलावा टिकवणे अवघड होत आहे. यावर्षी उन्हाळ्याच्या सुरवातीस खटाव-माणमधील 4 तलाव कोरडे, 11 तलावातील पाणी 50 टक्क्याच्या खाली आला असून पाणीसाठा अंतिम घटका मोजत आहे. 8 तलावात अद्याप मध्यम स्वरुपाचा पाणीसाठा शिल्लक आहे. तलावात पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

सध्या तालुक्यात ऊस,ज्वारी, बाजरी, हरभरा, गहू, कांदा आणि भाजीपाला यासारखी पिके घेतली जात आहेत. मात्र, भूजल पातळी खालावल्याने आणि जलसाठे आटत चालल्याने या पिकांवर मोठे संकट आले आहे. शेतीसाठी आवश्यक पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे पिके करपण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेतीचे संभाव्य नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत. कांदा आणि भाजीपाला करपण्याची भीती आहे. ज्यामुळे बाजारात किंमती वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. चाऱ्याअभावी पशुपालनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजना करणे गरजेच्या आहेत. यात उपलब्ध जलस्रोतांचे पुनर्भरण तातडीने करणे, टंचाईग्रस्त भागात तात्पुरता टँकरने पाणीपुरवठा करणे, अल्प पाण्यात पिके जगवण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करणे, गावस्तरावर जलसंधारणाच्या उपाययोजना जलदगतीने राबवणे हिताचे ठरणार आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने नागरिकांचे हाल वाढले आहेत. अनेक गावांमध्ये प्यायला पाणी मिळणे कठीण होत असल्याचे चित्र आहे. सार्वजनिक विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडत चालल्या आहेत. या गंभीर परिस्थितीत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

जलसंधारण प्रकल्पांना गती देणे, पाण्याच्या योग्य वितरणासाठी योजना आखणे गरजेचे आहे. अन्यथा, तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे जीवन अधिक कठीण होईल. माण-खटाव तालुक्यातील पाणीटंचाईबाबत प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. तातडीने उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच, सातारा सिंचन मंडळ सातारा अंतर्गत कृष्णा सिंचन विभाग साताराच्या गोंदवले बुद्रुक उपविभागात येणाऱ्या मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पातील 23 तलावांपैकी खटाव-माण तालुक्यातील 4 तलावातील पाण्याची टक्केवारी शून्य झाली आहे. तर 11 तलावातील पाणीसाठा 50 टक्क्यांच्या आत आला आहे.

नेर, राणंद, मायणी, पिंगळी, ढाकणी, जांभुळणी, मासाळवाडी, जाशी या 8 तलावात समाधाकारक स्थिती आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला तलाव कोरडे पडले जात आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग व सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त बनला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT