Pudhari
सातारा

Satara News: पैशांच्या वसुलीसाठी तगादा लावल्याने एकाने जीवन संपवले

कराड व ओगलेवाडी येथील दोघा विरोधात पोलिसात तक्रार

पुढारी वृत्तसेवा

कराड : व्याजाने घेतलेल्या पैशांच्या वसुलीसाठी वारंवार शिवीगाळ, दमदाटी आणि मानसिक त्रासाला कंटाळून एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दिलीप रामचंद्र मुळीक (वय ४५, रा. कराड) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी शोभा मुळीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विनायक मुळे (रा. अंडी चौक, कराड) आणि बशीर पठाण (रा. ओगलेवाडी, ता. कराड) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप मुळीक हे वाघेरी येथील हॉटमिक्स सिमेंटमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. २१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे डबा व पाण्याची बाटली घेऊन कामावर निघाले होते. त्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी घर ते कराड शहर पोलिस ठाणे या दरम्यान विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर ते कराड शहर पोलिस ठाण्यात पोहोचले.

पोलिसांनी त्यांना उपचारासाठी कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना २९ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांच्या भावाने अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

दरम्यान, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विनायक मुळे हा मुळीक यांच्या घरी आला होता. त्याने दरमहा सहा टक्के व्याजाने दिलेल्या ८० हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी दिलीप मुळीक यांनी ४० हजार रुपये घेतले असून ते परत केल्याचे सांगितले. मात्र, मुळे याने स्टॅम्प आणि दिलेला चेक आपल्याकडे असून पैसे न दिल्यास चेक बाऊन्सची न्यायालयीन कारवाई करण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

तसेच जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दिलीप मुळीक यांनी बशीर पठाण याच्याकडून दरमहा नऊ टक्के व्याजाने ५० हजार रुपये घेतल्याचे पत्नीला सांगितले. पैसे परत न केल्याने पठाण याने मुळीक यांची स्कूटी ताब्यात घेतल्याचेही त्यांनी सांगितले. पैसे परत केल्यानंतर स्कूटी घेऊन जाण्याचे पठाण याने सांगितल्याचा दावा फिर्यादीत आहे. या दोघांकडून पैशांच्या वसुलीसाठी वारंवार फोन, शिवीगाळ आणि दमदाटी होत असल्याने मुळीक मानसिक तणावात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT