सातारा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत आहे. बंदूक व जिवंत काडतूस बाळगणारेही वाढत आहेत. शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आले असून अक्षय यशवंत सुतार (वय 26, रा. मोरे कॉलनी, सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्यात दि. 20 मार्च रोजी एक गुन्हा दाखल झाला होता. अवैधरीत्या शस्त्र बाळगणार्यांची संख्या वाढत असल्याने पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, उपअधीक्षक राजीव नवले यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोनि सचिन म्हेत्रे यांना गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सचिन म्हेत्रे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस अधिकारी कुमार ढेरे व पोलिस अंमलदारांना संशयिताला अटक करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी येथील मंंगळवार पेठेतील गुन्ह्यातील घटनास्थळावर जावून माहिती घेवुन गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध घेणे सुरु केले. संशयित आरोपी अक्षय सुतार हा मोरे कॉलनी येथील परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 75 हजार रुपयांची बंदूक (पिस्टल) 500 रुपये किंमतीचा एक जिवंत काडतुस तसेच 12 हजार रोख रक्कम असा 87 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस अधिकारी कुमार ढेरे व पोलिस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे तसेच सायबर पोलिस ठाण्याचे अंमलदार महेश पवार, प्रशांत मोरे यांनी केली.