Child Malnutrition | कुपोषणामुळे चिमुकली ठरताहेत मधुमेहाचे बळी File Photo
सातारा

Child Malnutrition | कुपोषणामुळे चिमुकली ठरताहेत मधुमेहाचे बळी

आरोग्याच्या हेळसांडीचा परिणाम : सकस आहाराचा अभाव

पुढारी वृत्तसेवा
मीना शिंदे

सातारा : आनुवंशिकतेने बाळामध्ये येणार्‍या व्याधींबरोबरच कुपोषणामुळेही बालके गंभीर आजारांना बळी पडत आहेत. मधुमेह अशांपैकीच एक असून, केवळ गरोदरमाता व बालकाच्या आरोग्याच्या हेळसांडीमुळे कुपोषणाने चिमुकली टाईप-5 मधुमेहाचे बळी पडत आहेत.फास्टफूडचा अतिरेक व सकस आहाराच्या अभावानेही कुपोषणाचा टक्का वाढत आहे. कुपोषणमुक्तीसाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यासोबतच कुटुंबात गरोदर माता व बालकाच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याची गरज आहे.

बदलत्या जीवनशैलीमध्ये आहार-विहाराच्या सवयी बदलल्या आहेत. त्यातच दिवसेंदिवस वाढती स्पर्धा, ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, फास्टफूडचा अतिरेक यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढून आजार जडत आहेत. यामध्ये सर्वात जास्त रुग्ण हे मधुमेहाचे आढळून येत आहेत. बहुतांश घरांमध्ये एक तरी मधुमेही रुग्ण असतोच.

प्रामुख्याने आनुवंशिकतेच्या कारणातून उद्भवणार्‍या या आजाराला मोठ्यांबरोबरच लहानग्यांनाही धोका वाढत आहे. मधुमेहाचे एकूण 5 प्रकार आहेत. त्यापैकी टाईप-5 मधुमेह हा केवळ बालकांमध्ये आढळत असून, तो प्रामुख्याने कुपोषणामुळे होत असल्याचे वैद्यकीय संशोधनातून स्पष्ट झाले आहे. हे बालक मोठे झाले तरी त्याला या आजारावर उपचार घ्यावे लागतात. मधुमेहग्रस्त बालक गर्भधारणा काळातच कुपोषित राहिले असल्यानेे त्यांचे जन्मत:च वजन कमी असते. नंतरही त्यांच्या शरीरातील बहुतांश बीटा पेशी अविकसित राहून त्यांना मधुमेह होतो. या बालकांमध्ये इन्सुलिनचे प्रमाण कमी असते.

साधारणपणे बाळ आईच्या पोटात असताना तसेच जन्मानंतर दोन वर्षांचे होईपर्यंत त्याच्या स्वादुपिंडामध्ये बीटा पेशींव्दारे इन्सुलीन स्रवण्याचे प्रमाण निश्चित होत असते. त्यानंतर ते प्रमाण उर्वरित आयुष्यभर स्थिर राहते. स्वादुपिंडाच्या वाढीसाठी कुपोषण हानीकारक असते. गर्भवतीच्या कुपोषणामुळे तिच्या पोटातील बाळाच्या स्वादुपिंडाचा विकास योग्य प्रकारे न झाल्यास त्याच्या शरीरात इन्सुलिन कमी स्रवून मधुमेह होतो. टाईप 1 मधुमेहीच्या तुलनेत टाईप 5 मधुमेहींच्या शरीरात साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी असते; पण आहारात साखर घेण्याचे प्रमाण आश्चर्यकारकपण जास्त असते. या रुग्णांच्या पोटाच्या पोकळीत अंतर्गत चरबी खूप जास्त प्रमाणात मात्र यकृताच्या पेशींमधील चरबीचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यामुळे गरोदरमाता व बालकांची योग्य काळजी घेण्याची गरज आहे.

बाळाचे पहिले 1 हजार दिवस महत्त्वाचे...

बालकांचे कुपोषण व पर्यायाने टाईप-5 मधुमेह टाळण्यासाठी बाळाच्या आयुष्याच्या पहिल्या 1,000 दिवसांत माता व काळजीवाहकांना पोषणाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. कुपोषित मुलांमध्ये उंची, वजनासह वाढीवर लक्ष ठेवल्यास पौष्टिक कमतरता व चयापचय समस्यांची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास मदत होते. शाळा व सामुदायिक गटांद्वारे जागरूकता वाढवल्याने शाळा, शिक्षकांव्दारे निरीक्षण करुन बालकांना वेळेत औषधोपचार सुरू करणे शक्य होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT