देवापूर : स्व. यशवंतराव चव्हाण यांचा यशवंत विचार सातारा जिल्ह्याने जोपासला आहे. या जिल्ह्याने कधीही दडपशाही व हुकूमशाही खपवून घेतली नाही. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबियांशी लक्ष्मणराव पाटील यांची नाळ जोडली गेली आहे. त्यांचे आम्ही सुपुत्र आहोत. तात्या जसे कार्यकर्त्यांना सामाजिक संरक्षण देत होते तेच काम मी व नितीन करत राहिन. कार्यकत्यार्र्ंच्या पाठिशी खंबीरपणे राहणार आहे. त्यामुळे केवळ माण खटावच नव्हे तर जिल्ह्यात कुठेही मोगलाई चालू दिली जाणार नाही, असा इशारा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिला.
दहिवडी, ता. माण येथे जिल्हा बँक उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. नितीन पाटील, आ. सचिन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, अनिल देसाई, प्रदीप विधाते, शिवरूपराजे खर्डेकर, उदयसिंह उंडाळकर-पाटील, संजय देसाई, सुरेंद्र गुदगे, संदीप मांडवे, मनोज पोळ, पृथ्वीराज गोडसे, डी. के. पवार, राजेंद्र पवार, मनोज देशमुख, नितीन भरगुडे-पाटील, राजेश पाटील वाठारकर, प्रमोद शिंदे, संजय झवर, श्रींमत झांजुर्णे, महेंद्र देसाई, सुवर्णा देसाई, राजेंद्र राजपुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. मकरंद पाटील म्हणाले, अनिल देसाईंना राष्ट्रवादीची परंपरा सांगण्याची गरज नाही. त्यांनी राष्ट्रवादीत काम केले आहे. मधील कालावधीत त्यांनी वेगळा निर्णय घेतला होता. परंतु, ‘सुबह का भूला शाम को घर आया तो उसे भूला नही कहते’ याप्रमाणे अनिल देसाई यांची घरवापसी झाली आहे. आज अजितदादा येथे आले आहेत म्हणजे तुम्ही समजून घ्या. अजितदादा उत्तम प्रशासक आहेत, त्यांच्याकडे राज्याच्या तिजोरीची चावी आहे. एकदा शब्द दिला की तो शब्द पाळणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या अंगाला हात लावण्याची धमक कोणातही नाही. अनेक हुतात्मे जिल्ह्याने दिले आहेत.
ना. मकरंद पाटील म्हणाले, तुमची मंडळी ताप देतातंय ते माझ्याकडे येत आहेत. तुम्ही लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे, असे सांगत आहेत. त्यांना मी जाहीरपणे सांगतो की तुम्ही किती मताने निवडून येता हे जनतेला माहित आहे. मात्र, मी उच्चांकी मतांनी निवडून येतो. यंदाच्या निवडणुकीत 62 हजार मतांनी निवडून आलो आहे हे लक्षात घ्या. या मतदारसंघाला इतिहास आहे. आता थोडे पाणी आले असले तरी येथील जनता प्रतिकूल परिस्थितीत जगत आली आहे. प्रतिकूल परिस्थिती कस जगायच व कसं संघर्षाला सामोरे जायचं हे येथील जनतेला सांगायची गरज नाही. ही गोष्ट या मातीत व लोकांच्या रक्तात आहे, असेही ना. पाटील म्हणाले.
अनिल देसाई म्हणाले, माण-खटाव हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. या मतदार संघामधील लोक पवार कुटुंबावर प्रेम करणारे आहेत. या मतदार संघातील प्रशासन दबावाखाली काम करत असून ते महंमद तुघलकासारखं वागत आहे. रात्री अपरात्री आम्हाला नोटीसा पाठवल्या जात आहेत. वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी एक फोन आला म्हणून अधिकार्यांनी मला नोटीस काढली. चुकीचे काही असेल तर दहिवडीच्या बाजार पठांगणामध्ये मला फाशी द्या. कार्यकर्ता चुकत असेल तर त्याला फाशी द्या. पण प्रामाणिकपणे काम करणार्या कार्यकर्त्यांचा छळ होता कामा नये. विकास कामाबरोबरच कार्यकर्त्यांचे तुम्ही संरक्षण करा. तुमचं घड्याळ व तुम्ही सुध्दा आमच्या हृदयामध्ये आहात. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेवून बाहेर पडलो आहोत, तुमच्या आशिर्वादाचा हात फक्त पाठीशी राहुंदे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, तालुक्यात अजूनही टेंभूचे काम सुरु नाही. ते पूर्ण करण्यासाठी निधीची गरज आहे. तसेच उरमोडीचे पाणीही अजून शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचलेले नाही. या भागात पाणी पोहोचवण्यासाठी निधी मिळावा.
माण तालुक्यातील राष्ट्रवादीला पुन्हा गतवैभव मिळवून देवू : ना. पाटील
पोळ तात्यांच्या नेतृत्वाखाली अनेक संस्था कार्यरत होत्या. आपण एक एक कार्यकर्ता जोडायला सुरूवात करा. काहीही काळजी करू नका; दादा वर आहेत अन् जिल्ह्यावर मी आहे. कार्यकर्त्याच्या सुख दु:खात सहभागी व्हा. आगामी जि.प व पंचायत आणि नगरपालिका निवडणुका तुमच्या आमच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. यानंतर खटावमध्ये एक जंगी कार्यक्रम दादांना बोलावून होवू द्या. या दोन्ही तालुक्यात गेलेले गतवैभव पुन्हा मिळवू. यासाठी सर्वजण आपण सज्ज होवू, असे ना. पाटील म्हणाले.