लोणंद : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदानावेळी खंडाळ्यात तुफान राडा झाला. मतदानासाठी आलेल्या ना. मकरंद पाटील यांच्या कार्यकर्त्याने भाजप कार्यकर्त्याला ‘चोर चोर’ अशी शेरेबाजी केली. यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला ताणून ताणून चोपले. या घटनेवरून राष्ट्रवादी कार्यकर्ते व भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ जुंपली. मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या राड्याने खंडाळ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, जिल्हा बँकेसाठी तालुक्यात १०० टक्के मतदान झाले.
जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मतदारांना सहलीवर पाठवले होते. रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ना. मकरंद पाटील स्वतः महाबळेश्वर येथून मतदारांना घेऊन मतदान केंद्रावर दाखल झाले. यानंतर दुपारी दीडच्या सुमारास ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनीही फलटणहून भाजपच्या मतदारांना खंडाळ्यातील छत्रपती शिवाजी चौकापर्यंत आणले. परंतु, मतदान केंद्रावर येणे त्यांनी टाळले. त्यानंतर मिनी बसने हे मतदार मतदान केंद्रावर दाखल झाले. ही मिनी बस प्रशासकीय इमारतीच्या बाहेर थांबली होती. या बसमधून भाजपचे मतदार उतरले. या बसशेजारीच राष्ट्रवादीचे दोन कार्यकर्ते होते. यातील एकाने भाजपच्या पदाधिकार्यांना उद्देशून ‘चोर-चोर’ अशी शेरेबाजी केली. ‘चोर-चोर’ असे म्हटल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले. चोर म्हटल्यानंतर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पळत सुटला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्याला ताणून ताणून चोप दिला. भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गचुंडी धरत बुकलाबुकली केली. ही हाणामारी होत असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. यामुळे मतदान केंद्रावर एकच पळापळ झाली.
जवळपास १० ते १५ मिनिटे हा तुफान राडा सुरूच होता. अखेर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची पोलिसांनी सुटका करत त्याला प्रशासकीय इमारतीत नेले. जमावाला पांगवले. या राड्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याने दोन्ही पक्षांतील संघर्ष शिगेला पोहोचला असल्याचे दिसून आले.
खंडाळा तालुका सोसायटी मतदारसंघासाठी अजय भोसले विरुद्ध अनिरुद्ध गाढवे यांच्यातच सरळ लढत झाली. या निवडणुकीतील बंडखोर अपक्ष ॲड. शामराव गाढवे हे राष्ट्रवादीच्या गोटात जाऊन मिळाले. एकीकडे मतदारांना आणण्यासाठी दोन्ही मंत्र्यांची धावपळ, दुसरीकडे कार्यकर्त्यांमधील वाद आणि त्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, अशा वातावरणात खंडाळ्यातील जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली. तालुक्यात सर्व ८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
पाटील - गोरे वादाचा भडका उडणार
जिल्हा परिषद निवडणुकीत ना. मकरंद पाटील यांच्या मतदारसंघात भाजपचा सदस्य निवडून आणून ना. जयकुमार गोरे यांनी धोबीपछाड दिला होता. त्यानंतर वाई नगरपालिका आणि आता जिल्हा बँक निवडणुकीसाठी महायुतीतील हे दोन मंत्री समोरासमोर उभे ठाकले आहेत. दोन्ही मंत्र्यांनी एकमेकांवर टोकाची टीका केली होती; मात्र धराधरी आणि मारामारीचा प्रकार घडला नव्हता. जिल्हा बँक मतदानावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला हाणल्याने राष्ट्रवादीची अब्रू वेशीला टांगली गेली आहे. ही केवळ संघर्षाची नांदी आहे. या घटनेनंतर ना. पाटील विरुद्ध ना. गोरे या वादाचा भडका उडणार आहे.