CM Majhi Sundar Shala Abhiyan Pudhari
सातारा

Satara News : ‘माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल रखडला

शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ : राज्यभरातील २॥ हजार शाळांना प्रतिक्षा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राबवलेल्या तिसऱ्या टप्प्यातील ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल अद्याप जाहीर झाला नसल्याने राज्यातील सुमारे २ हजार ६१० शाळांमध्ये प्रतिक्षेचे वातावरण आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सुंदर शाळा स्पर्धेचा निकाल कधी लागणार असा प्रश्न शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांना पडला आहे.

शाळांमध्ये शैक्षणिक, गुणवत्ता, स्वच्छता, भौतिक सुविधा आणि उपक्रमशीलता वाढवण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याचा निकाल गेल्या सहा महिन्यापासून रखडला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होवूनही निकाल जाहीर झाला नसल्याने राज्यातील सुमारे २ हजार ६१० शाळांचे पुरस्कार गुलदस्त्यात राहिले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत शाळा व्यवस्थापन समित्या व मुख्याध्यापक, शिक्षक व पालकामधून नाराजी व्यक्त होत आहे.

राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेसाठी शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि शासकीय आश्रमशाळांचा एक गट, तर खासगी अनुदानित शाळांचा दुसरा गट तयार केला होता. तालुका, जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर स्पर्धा आयोजित करून प्रत्येक स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या शाळांना पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार शहर विभागातील तालुका, जिल्हा आणि महापालिका स्तरावरील २४६ शाळा, तर ग्रामीण भागातील तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावरील २ हजार ३५८ शाळांना पुरस्कार मिळणार आहेत. तसेच राज्यस्तरावरील ६ शाळांचा समावेश करून सुमारे २ हजार ६१० शाळांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी ७२ कोटी २२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र गेल्या सहा महिन्यापासून शासनस्तरावर पुरस्काराबाबत कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. अनेकदा शिक्षण विभागाकडे संबंधित शाळांच्या माध्यमातून विचारणा केली जात आहे. त्याबाबत वरिष्ठ स्तरावरून कोणतीही माहिती मिळत नाही. त्यामुळे पुरस्काराचा प्रश्न गुलदस्त्यातच राहिला की काय? असा प्रश्न सहभागी शाळांना पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT