सातारा : संगम माहुली परिसरात ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा आहे. या वेण्णा-कृष्णा घाटाचा पूर्णत: जीर्णोद्धार करावा, असा प्रस्ताव बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केला. दादांनीही त्याला तत्वत: मान्यता देत संबंधित खात्याला तातडीने पाहणी करण्याच्या सूचना दिल्या.
हा प्रस्ताव बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनाही बालाजीकडून सादर केला होता आणि त्यांच्याकडूनही पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे माहुली घाटाचा जीर्णोद्धार लवकरच होणार, अशी अपेक्षा राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केली आहे.
संगम माहुली परिसराची सध्याची परिस्थिती सादर करतानाच या घाटाचा कसा जीर्णोद्धार व्हावा, वृक्षारोपण, समाधींची देखभाल, सातार्याच्या पिण्याच्या पाण्याची शुद्धीकरण योजना तसेच पर्यटनवाढ याबाबतचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा या सादरीकरणा बाबत संबंधित खात्याच्या अधिकार्यांना पाहणी करून अंमलबजावणीबाबत पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सादरीकरणात पर्यावरण रक्षण, इको प्रेंडली बांधकाम आणि पर्यटन वाढ याला केंद्रीभूत ठेवण्यात आले आहे.
आराखडा सादर करताना बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संजय कदम, जगदीश खंडेलवाल, विश्वनाथ फरांदे व पदाधिकारी उपस्थित होते.