Mahesh Shinde file photo
सातारा

Mahesh Shinde: मी कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून येतो

आ. शिंदे : मी कुणाला त्रास दिला नाही, मला कुणी त्रास द्यायचा नाही

पुढारी वृत्तसेवा

सातारा : मी कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून येतो. त्यामुळे माझ्यावर कोणी चिडायचा प्रश्न येत नाही. मी कुणाला त्रास द्यायला गेलो नाही, मला कुणी त्रास द्यावयाचा नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा स्वभाव पहिल्यापासून वेगळाच आहे. त्यांची व माझी मैत्री चांगली आहे. ते कुणाशीही जास्त बोलत नाहीत. निवडणुकीच्या अगोदरच माझी भूमिका मी एकनाथ शिंदे यांच्याजवळ स्पष्ट केली होती. त्यांचा मला निरोप आला तर मी भेटावयास जाणार आहे. मला पहिल्यापासून कोणत्याही कार्यक्रमाला बोलावले जात नाही. त्यामुळे मी सभेला गेलो नसल्याचे स्पष्टीकरण आ. महेश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

आ. शिंदे म्हणाले, जाहीर सभा माझ्या मतदारसंघात नसून ती साताऱ्यात होती. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेली ती सभा होती. पहिल्या दिवसापासून माझा जिल्ह्यात कोणत्याही बॅनरवर फोटो नसतो. त्यामुळे मला वाईट वाटत नाही. पालकमंत्री स्वत: जिल्ह्याचे निर्णय घेत असतात. त्यांना योग्य निर्णय वाटेल ते पहिल्यापासून घेत असतात. ना. शिंदे यांच्या सभा झाल्या. ज्या सभेला बोलवले गेले त्या सभेला मी गेलो; पण जिथे बोलवले नाही तिथे आजपर्यंत मी गेलो नाही.

साताऱ्याच्या सभेला निमंत्रण दिले आहे का? यावर आ. शिंदे म्हणाले, सभेबाबत कोणीही निमंत्रण दिलेले नव्हते; परंतु मधल्या काळात ताणतणाव निर्माण झाल्याने नाराजी आहे का? ते बघावे लागेल. सभेतील सत्कार जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे आहेत. जिल्ह्यात ते राष्ट्रवादी बरोबर एकत्र होते. माझ्या येथे मात्र मी भाजपाबरोबर एकत्र होतो म्हणून मी भाजपाबरोबर गेलो.

कोरेगाव, खटाव येथील काहीजण माझ्याच पक्षात प्रवेश करत आहेत ही चांगली गोष्ट आहे. पर्यटन महोत्सव महाबळेश्वरात झाला, त्याचेही निमंत्रण मला नव्हते. पाटण व कराडमध्येही कधीही बोलावले गेले नाही. बऱ्याच दिवसापासून असेच चालू आहे. त्याची मला आता सवय झाली आहे. त्यामुळे मला काहीही वाटत नाही.

आमचे संपूर्ण कुटुंब भाजपाचे काम करत आहे...

माझी बायको 2011 पासून भाजपामध्ये आहे. संपूर्ण कुटुंब भाजपाचे काम करत आहे. 2019 ला कोरेगाव मतदारसंघ शिवसेनेला गेला. त्यामुळे मी शिवसेनेच्या चिन्हावर उभा राहून निवडून आलो. ना. देवेंद्र फडणवीस यांनी मला पाठवले होते. आपल्याकडे संख्याबळ किती आहे हे महत्त्वाचे आहे. भाजपाचे संख्याबळ 35 इतके होते, असेही आ. शिंदे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT