कोरेगाव : एकंबे गावातील आजी-माजी सैनिकांनी देश सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. अत्यंत चांगले काम करणार्या या सैनिकांप्रती आदर म्हणून सैनिक भवनाची उभारणी झाली आहे. कोरेगाव मतदारसंघात 68 ठिकाणी सैनिक भवन उभारले जाणार आहे, अशी ग्वाही आ. महेश शिंदे यांनी दिली.
एकंबे येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सुभेदार आनंदराव चव्हाण, भाजप नेत्या डॉ. प्रिया शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहूल बर्गे, संतोष जाधव, भाजप तालुकाध्यक्ष निलेश यादव, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, संजय काटकर, हणमंतराव जगदाळे, माजी जि.प. सदस्य बबनराव चव्हाण, गणेश शेळके, विठ्ठल शिंदे, पोलीस पाटील विकास शिंदे, अशोक चव्हाण, शिवाजी चव्हाण, सरपंच उर्मिला शिंदे, उपसरपंच अंकुश भोसले, श्रुतीन चव्हाण, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. महेश शिंदे म्हणाले, एकंबे गावाच्या विकासामध्ये कधीही दुजाभाव केला नाही, जास्तीत जास्त निधी या गावासाठी उपलब्ध करून दिला आहे. कोरेगाव ते एकंबे हा रस्ता पूर्णपणे ट्रीमिक्स काँक्रिटीकरण केले जाणार असून दोन्ही गावांमधील अंतर कमी केले जाणार आहे. एकंबे पंचक्रोशीतील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. एकंबे गावातील रस्त्यांचा प्रश्न सोडवला होता. मात्र माजी आमदारांनी केलेल्या कृतीमुळे बराचसा निधी माघारी गेला आहे. काही गोष्टींना वेळकाळ आणि मर्यादा असते, त्यामुळे नजीकच्या काळात आपण रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावू. पाच वर्षानंतर मुख्य रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असेही ते म्हणाले. बबनराव चव्हाण व उर्मिला शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक चव्हाण व शिरीष गोळे यांनी सूत्रसंचालन केले. बापू शेळके यांनी आभार मानले. कार्यक्रमास ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळा खोल्यांसाठी 1.6 कोटींचा निधी
एकंबे जिल्हा परिषद केंद्र शाळेचे काम अत्यंत उत्कृष्ट आहे. यापूर्वी या शाळेच्या तीन खोल्या मंजूर झाल्या असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.उर्मिला शिंदे यांनी प्रवेश करतेवेळी शाळेसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानंतर सातत्याने सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांच्या मागणीनुसार चार खोल्या उभारणीसाठी एक कोटी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचेही आ. महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.