विशाल गुजर
State Benefit For Wrestlers
सातारा : राज्यभरातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेले खेळाडू, तसेच हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी या किताबधारकांना मानधनात तब्ब्ल 13 वर्षांनी अडीचपट वाढ करण्यात आली आहे. या मानधनासाठी 1 कोटी 38 लाख 57 हजार 500 रुपये राज्याच्या क्रीडा खात्याकडून मंजूर करण्यात आले असून, राज्यभरातील 114 खेळाडूंना तब्बल तेरा वर्षांनी हे मानधन अदा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासह वार्षिक उत्पन्न मर्यादा ही एक लाखावरून दोन लाख करण्यात आली आहे.
कुस्ती खेळ गावपातळीपासून तो आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. मातीतील रांगडा खेळ म्हणून त्याची ओळख आहे. अनेक खेळाडूंनी आपल्या खेळाच्या जोरावर राज्याचे नाव जगभर पोहोचवले. उतारवयात त्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी राज्य शासनातर्फे सन 1993 साली प्रतिमाह मानधन देण्याचा निर्णय घेतला. महागाई आणि उतरत्या वयात होणार्या त्रासामुळे मानधनात वाढ व्हावी, अशी मागणी हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानांमधून होऊ लागली. याबाबत राज्यकर्ते व सरकार हे सकारात्मक असताना दिसले; पण नुसत्या घोषणा केल्या जात होत्या.
मार्च 2024 मध्ये या मानधनाच्या रकमेमध्ये भरघोस वाढ करण्याचा निर्णय झाला. मात्र, तेव्हापासून खेळाडूंचे मानधन थकीत गेले. त्यात राष्ट्रीयस्तरावरील मल्लास 2,500 वरून 7,500 रुपये, आंतरराष्ट्रीय, ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा विजेत्यास 6 हजारवरून 15 हजार रुपये, तर अर्जुन पुरस्कार, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम-ए-हिंद केसरी, भारत केसरी व महान भारत केसरी यांना 6 हजारांवरून 15 हजार मानधन देण्यात येणार आहे.
आयुष्यभर लाल मातीची सेवा करणार्या हिंद केसरीसह महाराष्ट्र केसरी, ज्येष्ठ मल्ल आणि त्यांच्या विधवा पत्नी यांच्यासह अन्य खेळाडूंनी मानधनासाठी क्रीडा खात्याच्या पायर्या झिजवल्या.
मानधन अदा करण्याची मागणी सातत्याने केली. अखेर क्रीडा विभागाकडून मानधनाची रक्कम मंजूर करण्यात आली. यात मुंबई शहर 4, मुंबई उपनगर 1, पुणे 33, सोलापूर 11, कोल्हापूर 17, सातारा 14, सांगली 12, बीड 3, लातूर 2, नागपूर 4, अमरावती 1, अहिल्यानगर 3, सिंधुदुर्ग 1, नाशिक 1, छत्रपती संभाजीनगर 1, रायगड 1, ठाणे 2, धाराशिव 2, वर्धा 1 अशा 114 पैलवानांना हे मानधन मिळणार आहे. त्या-त्या जिल्ह्यातील क्रीडा कार्यालयाकडून मानधन अदा करण्यासाठीची प्रक्रियाही सुरू झाली. वाढीव रकमेनुसार हे मानधन मिळणार असल्याने ज्येष्ठ खेळाडूंकडून याविषयी समाधान व्यक्त केले जात आहे.
मिळणारे मानधन दर महिन्याच्या किमान 1 ते 7 तारखेपर्यंत खात्यावर जमा व्हावे, अशी अपेक्षा खेळाडूंकडून व्यक्त होत आहे. मात्र, त्यांच्या मागणीला राज्याच्या क्रीडा खात्याकडून दाद मिळत नाही. कधीही वेळेवर मानधन मिळत नाही. विचारणा केल्यास सरकारी उत्तरे ज्येष्ठ मल्लांना दिली जातात. मानधनवाढीच्या मागणीलाही क्रीडा खात्याने केराची टोपली दाखवली आहे. वारंवार पत्रव्यवहार, विनंती अर्ज करूनही काही उपयोग होत नाही.
1993 पासून वयोवृद्ध खेळाडूंना मानधन देण्याच्या योजनेस प्रारंभ झाला. 1998 मध्ये मानधनात वाढ करण्यात आली. त्यानंतर 2001 मध्ये हिंद केसरी, रुस्तम-ए-हिंद केसरी, भारत केसरी, महान भारत केसरी हे किताब मिळवलेल्या मल्लांच्या मानधनात वाढ करण्यात आली. 2010 मध्ये महाराष्ट्र केसरी किताबाचा मानधन योजनेत समावेश करण्यात आला. 2010 व 2012 मध्ये मल्लांच्या मानधनात वाढ करण्यात आली होती.