सातारा : महाराष्ट्रात मराठी भाषेचीच सक्ती राहील, इतर कोणत्याही भाषेची सक्ती केली जाणार नाही. मराठी भाषा ही केवळ भक्तिगीतांपुरती मर्यादित नसून, स्वराज्य निर्मितीच्या काळापासून समाजाला दिशा देणारी सशक्त भाषा आहे.
मराठी भाषेला राजभाषा म्हणून लोकमान्यता मिळवून देण्याचा संकल्प सरकार पूर्ण करेल. आमच्या सरकारने महाराष्ट्रातील साहित्य संस्थांमध्ये हस्तक्षेप केला नाही. मी मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ते होणार नाही. साहित्य क्षेत्रामध्येही राजकारण आणू नका, असा चिमटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला. दरम्यान, भारतीय भाषांना विरोध करणारे विदेशी भाषांना पायघड्या का घालतात, असा खोचक सवालही ना. फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळा फाऊंडेशन, सातारा व अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने सातारा येथे आयोजित केलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ना. फडणवीस बोलत होते. यावेळी संमेलनाच्या उद्घाटक ख्यातनाम लेखिका मृदुला गर्ग, संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख तुषार दोशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, सुनील काटकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ उद्योजक फरोख कूपर, नंदकुमार सावंत, ॲड. चंद्रकांत बेबले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो की महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची आहे, इतर नाही. मुलांना कुठल्या वर्षी कुठली भाषा शिकवायची, याविषयी एक समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर तो महाराष्ट्रासमोर मांडू. साहित्यिक, विचारवंत यांची मतेही आम्ही जाणून घेवू, त्यानंतरच इतर भाषांच्या सक्तीचा निर्णय घेतला जाईल. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे. परदेशी भाषांना पायघड्या घालून भारतातील इतर भाषांना विरोध करायचा, हे योग्य नाही. साहित्य संस्थांमध्ये हस्तक्षेप करण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही. साहित्य क्षेत्रातही राजकारण आणू नका. वारकरी विचारांनी मराठीला समृध्द केले आहे. मराठी ही जोडणारी भाषा आहे. संत साहित्यामुळे मराठी जणांना एकत्र करण्याचे काम केले. धर्म, जात या मुद्द्यांवर ज्यावेळी आपण विभाजित होतो, तेव्हा संतांनी आपल्याला एकत्र करण्याचे काम केले आहे. मी साहित्यिक नाही, पण साहित्याचा मी सेवेकरी आहे. या संमेलनाच्या निमित्ताने माझ्या सेवेचा भाग उजळून निघाला आहे.
साताऱ्यात आल्यानंतर मला नेहमीच प्रेरणा मिळते. हा प्रदेशच मुळात संगमाचा आहे. कृष्णा-वारणा या नद्यांचा संगम याच प्रदेशात झाला आहे. साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर आणि वारणाकाठचे लेखक विश्वास पाटील यांना अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली असल्याने एका अनोख्या संगमाचा अनुभव येत आहे. आपले अध्यात्म, इतिहासाचे अवलोकन यातून सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. सर्वाधिक सहा इतकी अखिल भारतीय साहित्य संमेलने ही साताऱ्यात भरली असल्याने तोही एक विक्रम आहे.