सातारा

महाराष्ट्र केसरीची गदा : 2 किलो चांदीचा वापर

backup backup

सातारा; पुढारी वृत्तसेवा : 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेतील विजेत्या मल्लाला दिल्या जाणार्‍या गदेची उंची साधारण 27 ते 30 इंच तर व्यास 9 ते 10 इंच असतो. या गदेचे वजन 8 ते 10 किलो इतके असते. चांदीच्या आवरणाच्या आतमध्ये सागवानी लाकूड असते. 28 गेज जाड शुद्ध चांदीच्या पत्र्याचे वरुन आवरण असते. चांदीचे कोरीव काम या गदेची झळाळी आणखी वाढवते. गदेच्या मध्यभागी स्व. मामासाहेब मोहोळ यांची वर्तुळाकृती प्रतिमा चांदीच्या कोंदणात बसवली असते व बरोबर 180 अंश फिरवून हनुमानाचे चित्र वर्तुळाकार चांदीच्या कोंदणात बसवले असते. 2 किलो चांदीचा या गदेसाठी वापर केला जातो. चमचमणारी चांदीची गदा हेच महाराष्ट्र केसरीचे लाखमोलाचे व प्रतिष्ठेचे इनाम समजले जाते. गौरवशाली महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा ही मुठा (पुणे) येथील कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिली जात आहे. गेली 38 वर्षे मोहोळ कुटुंबियांनी ही परंपरा जपली आहे.

सांगलीचे श्रीपती खंचनाळे पहिले हिंदकेसरी

पुण्यात 1953 मध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली. 1959 पासून हिंदकेसरी स्पर्धा सुरू झाली आणि पहिलीच मानाची गदा कुस्तीपंढरीच्या सांगलीतील श्रीपती खंचनाळे यांनी जिंकण्याचा महापराक्रम केला. यानंतर पुन्हा एकदा हिंदकेसरीप्रमाणेच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचे निश्चित झाले. 1961 मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या अधिवेशनापासून सांगलीच्या दिनकर दह्यारी यांनी विरोधी मल्लाला चीतपट करून महाराष्ट्र केसरी अजिंक्य परंपरेचा श्रीगणेशा केला. त्यानंतर आजपर्यंत आढावा पहिला तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अनेक बदल होत गेले. मातीवर होणार्‍या कुस्त्या आता गादीवरही होऊ लागल्या. आतापर्यंत 63 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या आहेत. राजर्षी शाहूंच्या काळापासून कुस्ती पंढरी म्हणून कोल्हापूरचा नावलौकिक आहे. सर्वाधिक 16 वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अजिंक्यपद मिळवून कोल्हापूरच्या मल्लांनी निर्विवाद वर्चस्व राखले.

सातारा जिल्ह्यातील चौघे ठरलेत मानकरी

आतापर्यंत झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील चार जणांना 'महाराष्ट्र केसरी'चा किताब मिळाला आहे. या चार मल्लांनी विरोधी पैलवानांना आस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीवर मोहोर उठवली आहे. यात 1981 साली ढवळ (फलटण) येथील बापू लोखंडे यांनी कोल्हापूरच्या सरदार कुशाल याला चितपट करत महाराष्ट्र केसरीची पहिला गदा जिल्ह्यात आणली होती. त्यानंतर 1994 साली आटके (कराड) येथील संजय पाटील यांनी सोलापूरच्या मौला शेख याला, 1998 रोजी मिरगाव (फलटण) च्या गोरखनाथ सरकने सोलापूरच्या मौला शेखला तर 99 साली धनाजी फडतरे नागाचे कुमठे (खटाव) यांनी राजेश गरगुजे याला चितपट केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT