विभागात सातारा तिसरा; यंदा टक्का घसरला file photo
सातारा

विभागात सातारा तिसरा; यंदा टक्का घसरला

बारावी परीक्षेत जिल्ह्याचा निकाल 92.76 टक्के : विज्ञान शाखा टॉपर

पुढारी वृत्तसेवा

सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये जिल्ह्याचा निकाल 92.76 टक्के लागला. गतवर्षीच्या तुलनेत 0.87 टक्क्यांनी हा निकाल घसरला. गतवर्षी 93.63 टक्के निकाल लागला होता. सातारा जिल्ह्याने यावर्षीही कोल्हापूर विभागात तृतीय क्रमांक पटकावला. दरम्यान, विज्ञान शाखेचा निकाल 98.66 टक्के लागला असून गुणवत्तेत विज्ञान शाखा यावर्षीही टॉपवर राहिली आहे.

बारावी राज्य बोर्ड परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर झाला. परीक्षेसाठी 33 हजार 346 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 33 हजार 152 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 30 हजार 754 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 92.76 टक्के निकाल लागला. रिपीटरच्या 1092 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती.

1081 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 531 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रिपीटरचा निकाल 49.12 टक्के लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी धनजंय चोपडे यांनी दिली.

जिल्ह्यात विज्ञान शाखेसाठी 18 हजार 321 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी 18 हजार 288 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 18 हजार 043 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 98.66 टक्के निकाल लागला. कला शाखेसाठी 7 हजार 411 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी 7 हजार 294 विद्यार्थी परीक्षेस होते. त्यापैकी 5 हजार 623 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 77.09 टक्के निकाल लागला.

वाणिज्य शाखेसाठी 6 हजार 380 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी 6 हजार 349 विद्यार्थी परीक्षेस होते. त्यापैकी 5 हजार 983 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 94.23 टक्के निकाल लागला. व्यावसायिक शाखेसाठी 916 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी 907 विद्यार्थी परीक्षेस होते. त्यापैकी 824 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 90.84 टक्के निकाल लागला. आयटीआय शाखेसाठी 318 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी 314 विद्यार्थी परीक्षेस होते. त्यापैकी 281 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 89.49 टक्के निकाल लागला.

उत्तीर्णांमध्ये मुलींचाच टक्का वाढता...

सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या मुली बारावी बोर्ड परीक्षेत मुलांपेक्षा 6.21 टक्क्यांनी आघाडीवर राहिल्या आहेत. जिल्ह्यातील मुलांचे उत्तीर्णाचे प्रमाण 89.29 टक्के तर मुलींचे उत्तीर्णाचे प्रमाण 96.56 टक्के राहिले. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मुलींनी अव्वल स्थानावर राहून आपली गुणवत्ता कायम राखली आहे. गुणवत्तेच्या जोरावर होणार्‍या प्रवेश प्रक्रियेतही मुलींचा टक्का वाढणार हे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यातील 58 महाविद्यालये शंभर नंबरी

सातारा जिल्ह्यातील 303 शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांपैकी 58 शाळा व महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्यामध्ये सातारा, कराड, पाटण, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, फलटण , खटाव, माण, कोरेगाव तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांचा समावेश आहे.

कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले. बारावी परीक्षेचा कोल्हापूर विभागाचा निकाल 93.64 टक्के इतका असून कोल्हापूर विभाग राज्यात दुसर्‍या क्रमांकावर आहे. परीक्षेसाठी सहकार्य करणार्‍या सर्व घटकांचे आभार.
राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष कोल्हापूर व कोकण विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT