jaykumar gore 
सातारा

Primary Teacher Recruitment: प्राथमिक शिक्षकांची रिक्‍त पदे लवकरच भरणार, शासन सकारात्मक

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधानसभेत माहिती

पुढारी वृत्तसेवा

खटाव : राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची रिक्त पदे असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. ही बाब अत्यंत गांभीर्याने घेत शासन आवश्यक कार्यवाही करत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली.

आ. श्रीजया चव्हाण, जितेश अंतापूरकर आणि संजय देवकरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री गोरे म्हणाले, जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शिक्षक पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असल्याची शासनाला पूर्ण जाणीव आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा परिणामकारक वापर करण्यासह रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा विचार सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील परभणी, बीड, धाराशिव आणि जालना या जिल्ह्यांमध्ये सुमारे ४६६ अतिरिक्त शिक्षक उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे.

ज्या जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, तेथे आवश्यकतेनुसार या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यादृष्टीने प्रशासकीय कार्यवाही करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर व्हावी आणि शिक्षण व्यवस्थेवर होणारा ताण कमी व्हावा, यासाठी शासन सर्वंकष धोरणाच्या माध्यमातून आवश्यक निर्णय घेणार आहे.

शिक्षण हा ग्रामीण विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून, राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला सक्षम व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी ग्रामविकास विभाग कटिबद्ध असल्याचेही मंत्री गोरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT