मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले Pudhari File Photo
सातारा

Shivendraraje Bhosale | राज्यातील घाट रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने अधिक सुरक्षित करणार : मंत्री शिवेंद्रराजे भोसले

‘पुढारी’च्या वृत्तमालिकेची दखल

पुढारी वृत्तसेवा

सातारा : घाटरस्त्यांचे महत्त्व केवळ भौगोलिक द़ृष्टीनेच नव्हे, तर आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय द़ृष्टिकोनातूनही अत्यंत मोलाचे आहे. दै. ‘पुढारी’ने या वृत्तमालिकेद्वारे घाटरस्त्यांच्या समस्यांवर सखोल व वस्तुनिष्ठपणे लक्ष वेधले. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्रातील घाटमार्ग हे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच कर्नाटक व गोवा या राज्यांच्या दळणवळणाचे महत्त्वाचे दुवे आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घाटमार्गांची कामे करण्यात येत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. राज्यातील घाटरस्त्यांची वाढती धोकादायक स्थिती, घाटात कोसळणार्‍या दरडी, धोकादायक वळणे व त्यामुळे होणारे अपघात, अरुंद रस्ते आदी घाटरस्त्यांच्या समस्यांकडे दै. ‘पुढारी’ने ‘घाटरस्त्यांची वाट बिकट’ या वृत्तमालिकेद्वारे लक्ष वेधले.

यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत घाटरस्त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सुस्पष्ट धोरण आखले आहे. रस्ते वाहतुकीच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. दरडी कोसळण्याच्या घटना घडणार्‍या घाटात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जाळी (बोल्डर नेट), रोप बेस स्टॅबिलायझेशन आणि मजबुतीकरणाची कामे करण्यात येत आहेत. जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घाटरस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यापार्श्वभूमीवर घाटांत दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

या कामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. या घाटरस्त्यांची कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत. घाटमाथ्यावर वळणांच्या ठिकाणी सौरऊर्जेवर चालणार्‍या चेतावणी दिव्यांची योजना आखण्यात येत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होईल. दुर्गम घाटमार्गांवर तातडीची मदत मिळण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, रेस्क्यू टीम, स्वयंसेवी संस्था आणि ट्राफिक पोलिसांशी संपर्क साधून त्वरित प्रतिसाद देणारी यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. काही घाटमार्ग हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असल्यामुळे या यंत्रणेशी सतत संपर्क ठेवून प्रवाशी व वाहनचालकांच्या समस्या सोडवण्यात येत आहेत. घाटरस्ते वन विभागाच्या हद्दीतून जात असल्याने काम करण्यास परवानगी मिळत नाही किंवा वेळ लागतो. त्यामुळे घाटरस्त्यांचे रुंदीकरण करण्यास अडचणी येतात. राज्याच्या विकासात घाटरस्त्यांची भूमिका कधीही दुर्लक्षित करता येणार नाही.

वृत्त मालिकेतून वेधले लक्ष

राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, ठाणे आदी जिल्ह्यातील घाट रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दैनिक ‘पुढारी’ने ‘घाट रस्त्यांची वाट बिकट’ वृत्त मालिकेच्या माध्यमातून लक्ष वेधले होते. आठ भागांच्या या मालिकेत कुंभार्ली, आंबा, अणुस्कुरा, आंबोली, तिलारी, करुळ, कशेडी, आंबेनळी, खंबाटकी, कसारा घाटातील सुरक्षेचा आढावा घेतला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT