सातारा

Jaykumar Gore : शेळ्या-मेंढ्यांसाठीही चारा छावण्या सुरु करणार

ना. जयकुमार गोरे : मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच निर्णय

पुढारी वृत्तसेवा

दहिवडी : माण-खटावच्या दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी शासन युद्धपातळीवर प्रयत्नशील असून, लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरांसह शेळ्या-मेंढ्यांसाठीही चारा छावण्या सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. तसेच पिण्याचे पाणी कोणत्याही परिस्थितीत उद्योगधंद्यांना देऊ नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

गोंदवले बुद्रुक येथील शेतकरी भवनमध्ये आयोजित माण-खटाव दुष्काळी आढावा बैठकीत ते बोलत होते. माण तालुक्यातील १०४ गावांमध्ये उपसाबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून, बैठकीत टंचाई आराखडाही सादर करण्यात आला.

दुष्काळी परिस्थितीत अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडून जाऊ नये. प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करून जनतेच्या पाणी, चारा आणि रोजगाराच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश ना. गोरे यांनी दिले. गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, माण-खटावमधील नागरिकांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. चाऱ्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने गुरांसाठीच नव्हे, तर शेळ्या-मेंढ्यांसाठीही चारा छावण्या सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे. पशुधन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही दुष्काळग्रस्त माण-खटावच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभे असल्याचे सांगितले. या बैठकीस आ. धैर्यशील कदम, मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सोनिया गोरे, जिल्हा परिषद सदस्या अलका जगदाळे, पंचायत समिती सदस्य अर्जुन काळे, राजाराम बोराटे, बाळासाहेब कदम, अरुण गोरे, सोमनाथ भोसले, संजय गांधी, खटाव पंचायत समितीच्या सभापती वनिता दुबळे आदी उपस्थित होते. प्रा. बंडा गोडसे, डॉ. विवेक देशमुख, मामुशेठ जगदाळे, राजाराम बोराटे, सरपंच दादासाहेब काळे यांच्यासह अनेकांनी स्थानिक समस्या मांडल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT