सातारा : देशातील प्रत्येक बेघर व्यक्तीला घर मिळाले पाहिजे हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण होत आहे. मोदींच्या माध्यमातून व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याला उच्चांकी 30 लाख घरे मिळाली. वर्षात 5 लाख 8 हजार घरे पूर्ण झाली आहेत.राज्यातील महिला बचत गटांचे उमेद मॉल प्रत्येक जिल्ह्यात निर्माण करणार आहे. वर्षात 5 लाख घरे बांधणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
दरम्यान, जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांसमोर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावर केंद्र सरकारने मार्ग काढण्यासाठी राज्याचा आढावा घ्यावा, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.
साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पाच लाख घरांचे लोकार्पण केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आ. सचिन पाटील, आ. महेश शिंदे, आ. डॉ. अतुल चव्हाण, आ. मनोज घोरपडे, जि. प. अध्यक्षा प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर, सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, सचिव एकनाथ डवल, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलिस प्रमुख निखील पिंगळे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जयकुमार गोरे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर साधेपणाने हा कार्यक्रम घेण्यात आला. यापूर्वी राज्याला 13 लाख घरांचे 10 वर्षांसाठीचे उद्दिष्ट मिळाले होते. आता मात्र एका वर्षांत उच्चांकी 30 लाख घरांचे उद्दिष्ट केंद्र सरकारकडून मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या 40 दिवसांत या घरांना मंजुरी देण्यात आली. 10 लाख घरांचा पहिला हप्ता त्याचवेळी देण्यात आला. मुख्यमंत्र्यांकडून सतत पाठपुरावा झाल्यामुळेे पाच लाख घरांचे हे काम विक्रमी वेळत पूर्ण झाले. घरांचा दुसरा हप्ता 16 लाख घरांना तर तिसरा हप्ता 10 लाख 17 हजार घरांना, चौथा हप्ता 2 लाख 90 हजार घरांना तर पाचवा हप्ता 53 हजार घरांना दिला आहे. ग्राम विकास खात्याचा 15 लाख घरे पूर्ण करण्याचा संकल्प आहे. राज्य सरकारने 1 लाख 81 हजार लाभार्थ्यांना जागा दिली.
जागा खरेदी करण्यासाठी 1 लाखांचे अर्थसहाय्य करण्यात येत आहे. 50 लाख लखपती दिदी केल्या. 1 कोटी लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. 50 हजार 150 कोटींचे कर्ज बचत गटांना देण्यात आले आहे. ज्या जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून काम केले त्याच जिल्हा परिषदेत ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून आलो, असल्याची आठवण त्यांनी आवर्जून करून दिली.
ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, प्रधानमंत्र्यांनी घरकुलांची दिलेली जबाबदारी राज्याने पार पाडली. घरे नसणाऱ्या गरीबांना हक्काचे घर दिल्याने दिलासा मिळाला. प्रधानमंत्र्यांचे स्वप्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यामातून पूर्ण होत आहे. जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांसमोर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. यावर केंद्र शासनाकडून मार्ग काढणे आवश्यक असून त्यावर निर्णय घेणे गरजेचे आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या चर्चेनुसार राज्याचा आढावा घ्यावा, अशी मागणी केली.