सातारा : राज्यात जुलै व ऑगस्ट 2025 या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या 19 लाख 22 हजार 909 शेतकर्यांच्या 15 लाख 45 हजार 250.05 हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीपोटी 1 हजार 339 कोटी 49 लाख 25 हजारांच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
या मदतीबाबचा शासन निर्णय जारी केल्याचे सांगून ना. पाटील म्हणाले, नुकसानग्रस्त शेतकर्याला तत्काळ मदत करून त्याचे जीवन सुकर करण्यासाठी ही मदत निश्चितच उपयोगी पडेल.
अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांतील 7 लाख 88 हजार 974 शेतकर्यांच्या 6 लाख 54 हजार 595.42 हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी 565 कोटी 60 लाख 30 हजारांच्या मदतीस मान्यता दिली. नागपूर विभागातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांतील 37 हजार 631 शेतकर्यांच्या 21 हजार 224.64 हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीपोटी 23 कोटी 85 लाख 26 हजाराच्या मदतीस मान्यता दिली. पुणे विभागात कोल्हापूर जिल्ह्यातील 36 हजार 559 शेतकर्यांच्या 8 हजार 835.15 हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी 14 कोटी 28 लाख 52 हजारांच्या मदतीस मान्यता दिली.
छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांतील 10 लाख 35 हजार 68 शेतकर्यांच्या 8 लाख 48 हजार 445.37 हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी 721 कोटी 97 लाख 86 हजाराच्या मदतीस मान्यता दिली गेली. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 24 हजार 677 शेतकर्यांच्या 12 हजार 149.46 हेक्टरवरील शेत पिकांच्या नुकसानीपोटी 13 कोटी 77 लाख 31 हजारांच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.