सातारा

Beekeeper Registration Portal: इस्‍त्रायलच्या धर्तीवर राज्‍यात मधपाळ नोंदणी पोर्टल

मधपाळ व विक्रेत्याला डिजिटल ओळखपत्र : मध संचलनालयाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

सातारा : इस्‍त्रायलमध्ये प्रत्येक मधउत्पादक व विक्रेत्यांची अचूक नोंद ठेवली जात आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात एक स्वतंत्र मधपाळ नोंदणी पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक विक्रेत्याला व मधपाळाला एक विशेष डिजिटल ओळखपत्र मिळणार आहे. यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्‍या मधपाळांची माहिती संकलित करून त्याची एकत्रित नोंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकाला अधिकृत विक्रेत्याची ओळख पटण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत शेतकरी व मधपाळांना एक स्वतंत्र मधपाळ नोंदणी पोर्टलमुळे पहिल्यांदाच एक अधिकृत ओळख मिळण्यास मदत होणार आहे. राज्याच्या दुर्गम व डोंगरी भागात मधपाळ शेतकरी वर्षानुवर्षे मध उत्पादन करत आहेत. पण, या मधपाळ शेतकऱ्यांची शासनाच्या रेकॉर्डमध्ये नोंद नव्हती. त्यामुळे या शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता. बँकामार्फत कर्जही मिळत नव्हते. मधमाशी पेट्यांचे आंतरराज्य स्थलांतर करताना अडचणी निर्माण होत होत्या. मधाची खरी किंमत मिळत नव्हती त्याचा दलालच फायदा घेत होते. या सर्व गोष्टीवर महाराष्ट्रात एक स्वतंत्र मधपाळ नोंदणी पोर्टल सुरू करण्यात येणार आहे.

या प्रस्तावित पोर्टलवर मधाचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या विक्रेत्याला आणि मधपाळाला आपली अधिकृत नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक असणार आहे. नोंदणीनंतर प्रत्येक विक्रेता, मधपाळाला शासनातर्फे एक विशेष डिजिटल ओळखपत्र दिले जाईल. ज्यामुळे ग्राहकाला अधिकृत विक्रेत्याची ओळख पटेल. सध्या पुणे येथील केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडे देखील अशी अद्ययावत नोंदणी उपलब्ध नसल्यामुळे ही नवीन प्रणाली अत्यंत उपयुक्त व महत्वपूर्ण ठरणार आहे.

मधपाळ नोंदणी पोर्टलमुळे देशासह राज्यातील मधमाशी पालक शेतकऱ्यांना एक अधिकृत डिजिटल ओळख आणि मान्यताप्राप्त व्यावसायिक म्हणून नवी ओळख मिळणार आहे. या नोंदणीमुळे त्यांना सरकारी योजनांचा थेट लाभ मिळवणे, मध आणि मेणाची गुणवत्ता तपासणे व पारदर्शक बाजारपेठ उपलब्ध होणे सोपे होणार आहे. तसेच मधपाळ शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या मधमाशी पालनाशी संबंधित विविध अनुदान व योजनांचा लाभ मधपाळ नोंदणी पोर्टलमुळे होण्यास मदत होणार आहे.

या पोर्टलवर विक्रेता व मधपाळाला नोंदणी बंधनकारक केली जाईल. नोंदणीनंतर प्रत्येक विक्रेता, मधपाळाला शासनातर्फे एक विशेष डिजिटल ओळखपत्र दिले जाईल. ज्यामुळे ग्राहकाला अधिकृत विक्रेत्याची ओळख पटेल.
- रविंद्र साठे, सभापती, खादी व ग्रामोद्योग मंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT