खटाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास व पंचायतराज विभागाने राज्यात 17 नवीन ग्रामपंचायतींच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. याबाबतचे शासन निर्णय राज्यपालांच्या आदेशाने राजपत्रात प्रकाशित करण्यात आले आहेत. या निर्णयाने ही 17 गावे ग्रामविकासाच्या मुख्य प्रवाहात आली असल्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील चिंद्रवली व उमरे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील निंबायती व रामपुरा, पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील ढाकाळे व खामगळवाडी, जुन्नर तालुक्यातील एडगाव व भोरवाडी, दौंड तालुक्यातील गार, बेटचीवाडी, मवीनगार, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक व कुरण तर बदनापूर तालुक्यातील हिवराराळा व हनुमान नगर, नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पोटा व चनकापूर या गावांसाठी नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा निर्णय ग्रामविकास व पंचायतराज विभागाने घेतला आहे. या महसूली गावांचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र स्वतंत्र गाव असणार आहे. नवनिर्मित 17 ग्रामपंचायतींच्या माध्यमातून या गावांची विकास प्रक्रिया अधिक गतीने होणार असल्याचे ना. गोरे यांनी सांगितले.