सातारा : मराठा साम्राज्याच्या इतिहासातील त्याग, धैर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या महाराणी येसुबाई यांच्या साताऱ्यातील पुनरागमनाला आज शनिवार दि. ४ जुलै रोजी ३०७ वर्षे पूर्ण होत आहेत. तब्बल २९ वर्षे मोगलांच्या कैदेत राहिल्यानंतर ४ जुलै १७१९ रोजी त्या राजधानी साताऱ्यात दाखल झाल्या. त्यांच्या आगमनाने तत्कालीन राजधानीत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. या इतिहासाला राजधानीत उजाळा दिला जात आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराणी येसुबाई आणि बाल शाहू महाराज यांना मोगलांनी कैदेत ठेवले. जवळपास तीन दशके अत्यंत कठीण परिस्थितीत कैद भोगल्यानंतर त्यांची सुटका झाली. दि. ४ जुलै १७१९ रोजी त्या साताऱ्यात परत आल्या. छत्रपती शाहू महाराजांनी राजधानीच्या वेशीवर मातोश्रींचे भव्य स्वागत केले. त्यानंतर त्यांनी आयुष्याचा उत्तरार्ध साताऱ्यात व्यतीत केला.
इतिहास अभ्यासकांच्या मते, त्यांचे निधन सुमारे १७२९ मध्ये झाले. इतिहासातील नोंदीनुसार, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल सत्तेतील अंतर्गत संघर्षाचा फायदा घेत मराठ्यांनी दिल्लीत राजकीय मोहीम उभारली. बाळाजी विश्वनाथ, सेनापती खंडेराव दाभाडे आणि सय्यद बंधूंच्या सहकार्याने दिल्ली दरबारावर दबाव निर्माण करण्यात आला. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींमुळे महाराणी येसुबाईंची सुटका झाली आणि ४ जुलै १७१९ रोजी त्यांनी साताऱ्यात पुनरागमन केले. हा दिवस मराठा इतिहासातील भावनिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यावेळच्या प्रसंगाला आज शनिवारी ३०७ वर्षे पूर्ण होत आहेत.