सातारा : राज्य सरकारच्या महाआयटी विभागाने मार्च एंडनंतर एप्रिल महिन्यात आलेल्या सलग सुट्ट्यांचा मुहूर्त साधत सुरू केलेल्या सॉफ्टवेअर अपग्रेडमुळे सातारा जिल्ह्यातील सेतू कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात हजारो दाखले रखडले असून विद्यार्थी, पालक तसेच चिंतातूर झाले आहेत. अनेक उमेदवारांना दाखल्यांविना परीक्षेचा फॉर्म भरण्यास अडथळा येण्याची शक्यता निर्माण झाल्याने महाआयटीच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महाआयटी विभागाकडून गेले आठ दिवसांपासून सॉफ्टवेअर अपग्रेडचे काम सुरू आहे. मात्र तरीही सेतू कार्यालयातील दाखल्यांची ऑनलाईन सेवा पूर्ववत झालेली नाही. दिवसभरात एखादाच दाखला मंजूर होत असून त्यानंतर ‘एरर’ येत आहे. पालकांना दिवस-दिवस तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, सेतू कार्यालयात ताटकळत बसावे लागत आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांचा दबाव सहन करत संबंधित कार्यालयतील अधिकारी व कर्मचार्यांना प्रसंगी त्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहेत. यातून खटके उडत असून वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.
दाखले मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश, परीक्षांचे अर्ज आणि इतर शैक्षणिक प्रक्रियांना सामोरे जाताना अडथळे येत आहेत. विविध प्रकारचे दाखले मिळण्यासाठी सेतू कार्यालयात सध्या प्रचंड गर्दी दिसत आहे. परंतु तांत्रिक अडचणींमुळे कामकाज ठप्प झाले आहे. अनेक विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘आमच्या मुलांचे भविष्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे अंधारले आहे,’ अशा प्रतिक्रिया पालक व्यक्त करत आहेत.
महाआयटी विभागाच्या या अपग्रेड प्रक्रियेबाबत कोणतीही पूर्वसुचना दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सॉफ्टवेअर अपग्रेडची प्रक्रिया नियोजनपूर्वक झाली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसतील, असे अधिकार्यांचे म्हणणे आहे. सॉफ्टवेअर अपग्रेडदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.