सातारा : जिल्ह्यासह महाबळेश्वरमध्ये बांग्ला देशींची घुसखोरी वाढली असून त्याविरोधात महसूल व पोलिस प्रशासनाने कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवावी. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडून मुस्लिमांचे तुष्टीकरण सुरू असून बांगला देशी वाचवण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यांच्याकडून व्होट जिहाद सुरू आहे. त्यांनी मुस्लिम व बांगला देशींची पूजाअर्चा केली तर हिंदू नेत्यांकडे वाकड्या नजरेने बघू नये. महाबळेश्वरमधील अनधिकृत बांधकामांची चौकशी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल मंत्रालयाला प्राप्त झाल्यावर कारवाई होणार आहे, असा इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिला.
महाबळेश्वर व परिसरात बांगला देशींची वाढलेली संख्या तसेच रिसॉर्टस् व हॉटेल व्यावसायिकांनी केलेली अनधिकृत बांधकामे यासंदर्भात केलेल्या तक्रारीची माहिती घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, सातारा जिल्ह्यात होणाऱ्या बांगला देशी अतिक्रमणासंदर्भात महसूल व पोलिस प्रशासनाने कोम्बिंग ऑपरेशन करणे गरजेचे आहे. खोटी जन्म प्रमाणपत्रे घेतली जात असून विशिष्ट ठिकाणी बांगला देशींची अतिक्रमणे होत आहेत. यासदंर्भात सातारा जिल्हाधिकाऱ्यांशी विशेष चर्चा झाली आहे. महाबळेश्वर हे वन संरक्षित आहे. काही रिसॉर्ट तसेच हॉटेल्सची बेकायदा बांधकामे केली असल्याची मिळालेली माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली असल्याने त्यांनी सांगितले.
महाबळेश्वरमध्ये बांगला देशी घुसखोरी, अतिक्रमणे व बेकायदा बांधकामांबाबत किरीट सोमय्या म्हणाले, मी महाराष्ट्रातील जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर काढला. त्यामध्ये साताऱ्यात अशी प्रमाणपत्रे कमी आढळली. ही जन्मप्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. सातारा जिल्ह्यासह राज्यात सुरु असलेल्या विविध प्रकारच्या प्रकल्प कामांसाठी बांगलादेशी कामगार येत आहेत. त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली असून पोलिस प्रशासनाने यासंदर्भात कोम्बिंग ऑपरेशन करावे, असे त्यांनी सांगितले.
तुम्ही महाबळेश्वरमधील हॉटेल्स तसेच बंगलोच्या काढलेल्या माहितीत राजकीय नेत्यांची नावे आहेत का? असे विचारले असता किरीट सोमय्या म्हणाले, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समितीच्या झालेल्या बैठकीत चौकशीचे आदेश दिले होते. इन्स्पेक्शन सुरु झाल्याचे प्रशासनाने सांगितले असून ही तपासणी आज संध्याकाळपर्यंत संपणार असल्याने महाबळेश्वरला जाणार आहे. त्याठिकाणी याबाबत पुढील माहिती मिळेल. अनधिकृत बांधकाम पर्यावरण नियमांचा भंग करून केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
तुम्ही काढलेल्या माहितीत 23 मालमत्तांची यादी असून त्याठिकाणी राजकीय नेते येऊन राहतात तसेच त्यांची हेलिपॅडही त्याठिकाणी आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांची नावे जाहीर करण्यामागची भूमिका काय? असे विचारले असता किरीट सोमय्या म्हणाले, गेली वर्षभर या विषयाचा अभ्यास करून पाठपुरावा करत होतो. ठोस माहिती तसेच या विषयाचा होमवर्क झाल्यानंतर महिन्यात दोनवेळा मंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यांनी यासंदर्भात इन्स्पेक्शनचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार कामकाज सुरू झाले, असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात महायुतीचे आमदार, मंत्री असताना तुम्हाला साताऱ्यात यावे लागते ही बाब तुमच्यासाठी समाधानकारक आहे का? असे विचारले असता किरीट सोमय्या म्हणाले, पक्षाने जबाबदारी दिल्याने ही बाब माझ्यासाठी अभिमानाची आहे. सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मला मान-सन्मान देतात. महाबळेश्वरचे पर्यावरणही जपले पाहिजे. देशाच्या सुरक्षेचा हा महत्त्वाचा विषय असल्याने देशातून बांगलादेशी गेलेच पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितले म्हणून तुम्ही हे करत आहात का? असे विचारले असता किरीट सोमय्या म्हणाले, हे मी करत असलो तरी त्याला वरिष्ठांचाही पाठिंबा आवश्यक असतो. मी आतापर्यंत जेवढे विषय उचलले, त्यामध्ये मला कुणी थांबायला सांगितलेले नाही. राजकीय तडजोड हा वेगळा विषय आहे. या प्रकरणात माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीचे वातावरण असले तरी काँग्रेसचे नेते, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडून मुस्लिमांचे तुष्टीकरण सुरू असून बांगलादेशींना वाचवण्याची या पक्षांमध्ये स्पर्धा सुरु आहे. या नेत्यांमध्ये गोल टोपी घालणाऱ्या आणखी एका नेत्याची भर पडली आहे. मुस्लिम तसेच बांगलादेशींच्या बाजूने या पक्षांतील नेते बोलत असले तरी त्यांनी हिंदू नेत्यांची छेडछाड करण्याचे धाडस करु नये. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी व पक्ष जिवंत राहण्यासाठी एका नेत्याने हिरवे कपडे घातले आहेत. मात्र आमच्या भगव्याकडे बघू नका, असा इशारा त्यांनी दिला.