महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्याच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने मुसंडी मारत तळदेव गटावर कब्जा केला. तर अपेक्षेप्रमाणे भिलार गट हा राष्ट्रवादीकडे राहिला. तीच परिस्थिती गणातही राहिली असून तळदेव व कुंभरोशी शिवसेना तर भिलार आणि मेटगुताड हे गण राष्ट्रवादीकडे राहिले. त्यामुळे तालुक्यात फिफ्टी फिफ्टी वातावरण राहिले आहे. महाबळेश्वर तालुक्याचे नेते म्हणून ओळखले जाणारे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांच्या उमेदवारांचा तळदेव गटासह दोन्ही गणांमध्ये झालेला पराभव आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे जणू त्यांच्या वर्चस्वाला शह देणारा ठरला आहे. राष्ट्रवादीचे तळदेव गटाचे उमेदवार व तालुक्याचे नेते पंचायत समितीचे माजी सभापती संजूबाबा गायकवाड यांचा तळदेव गटामध्ये शिवसेनेच्या नवख्या उमेदवाराकडून तब्बल तीन हजार मतांनी झालेला पराभव धक्कादायक मानला जात आहे. या गटात संजूबाबांना स्वकीयांनीच गेम केली असल्याची चर्चा आहे.
महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषदेचे तळदेव व भिलार हे दोन गट व पंचायत समितीचे तळदेव, कुंभरोशी, मेटगुताड व भिलार हे चार गण आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजप अशी तिरंगी लढत झाली. मात्र, खरी लढत ही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच झाली होती. महाबळेश्वर शहरातील गिरीस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयेच्या प्रांगणात सोमवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीस निवडणूक निरीक्षक अमोल यादव, निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली राजमाने व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. मतमोजणीच्या एकूण 13 फेऱ्या पार पडल्या 12 टेबलवर ही मतमोजणी पार पडली.
प्रारंभी तळदेव गट व कुंभरोशी गणाच्या मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे संजय गायकवाड व कुंभरोशी गणाचे सचिन उतेकर आघाडीवर होते. मात्र, तिसऱ्या फेरीपासून तळदेव गटातील शिवसेनेचे अजित संकपाळ व कुंभरोशी गणात संजय मोरे यांनी मोठी आघाडी घेतली. यानंतर त्यांचे मताधिक्क्य वाढतच राहिले. पहिला निकाल कुंभरोशी गणात आला. येथे संजय मोरे यांनी सचिन उतेकर यांचा 334 मतांनी पराभव केला. यामुळे राजपुरेंच्या वर्चस्वाला धक्का बसला असून सेनेने आपला गड शाबूत ठेवला.
तळदेव गटात सेनेच्या अजित संकपाळ यांनी राष्ट्रवादीच्या संजूबाबा गायकवाड यांचा तब्बल 3 हजार मतांनी धक्कादायक पराभव केला. या निकालाने त्यांचा गट व तालुक्यावरील होल्ड कमी होणार असून त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यांचा स्वकीयांनी केलेला घात अन् अतिआत्मविश्वास नडल्याची चर्चा आहे. तळदेव गणात शिवसेनेचे संजय शेलार यांनी राष्ट्रवादीच्या संजय उतेकर यांचा 2 हजार 10 मतांनी पराभव केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागाच्या विकासासाठी घेतलेली मेहनत आणि कोट्यवधींचा दिलेला निधी यामुळे गटावर शिवसेनेचा भगवा फडकला. या निकालाने राष्ट्रवादीच्या नेतेंमंडळींना धक्का दिला आहे. गतवेळच्या निवडणुकीत स्वतः च्या ताब्यात असलेला तळदेव गणदेखील राष्ट्रवादीच्या ताब्यातून निसटला आहे. राष्ट्रवादीच्या नाराजांच्या गटाने शिवसेनेच्या उमेदवारास मदत केल्याची चर्चा आहे.
तळदेव गटात सपाटून मार खाणाऱ्या राष्ट्रवादीला भिलार गटाने साथ दिली आहे. या गटात राष्ट्रवादीचे संजय केळगणे यांनी भाजपच्या रंजना कदम यांचा तब्बल 6 हजार 93 मतांनी पराभव केला. येथे शिवसेनेच्या प्रदीप चपटे यांना केवळ 1 हजार 175 मते मिळाली. या गटात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. मात्र, स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या कुटुंबातील नितीन भिलारे यांनी निवडणुकीत भाजपला दिलेली साथ चर्चेचा विषय ठरली. या गटात भाजपने अपेक्षित प्रचार न केल्याचा फटकाही भाजपला बसला.
भिलार गणात राष्ट्रवादीच्या वंदना भिलारे यांनी भाजपच्या सुप्रिया भिलारे यांचा तब्बल 4 हजार 144 मतांच्या फरकाने विजय मिळवला. भाजपच्या सुप्रिया भिलारे यांचे पती अनिल भिलारे यांनी पक्षाकडुन तिकीट मिळवले. मात्र, ते भिलार गावातच अडकून पडले. इतर ठिकाणी त्यांनी प्रचारच केला नाही. त्यांच्यासाठी ना. शिवेंद्रराजेंनी घेतलेली सभाही फोल ठरली. त्यामुळे 1 हजार मतेही त्या मिळवू शकल्या नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने मोठया फरकाने विजय मिळवला. मेटगुताड गणात राष्ट्रवादीच्या शकुंतला चोरमले यांनी भाजपच्या अमीना शारवान यांचा 1 हजार 86 मतांनी विजय मिळवला. अपक्ष वैशाली जाधव यांनाही या गटात चांगली मते मिळाली. हा गण पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आरक्षित असल्याने सर्वच पक्षांनी ताकद लावली होती. येथे शकुंतला चोरमले यांनी बाजी मारल्याने त्याच सभापती होतील, अशी चर्चा आहे. या भागात राजेंद्र राजपुरे यांचा करिष्मा चालला असला तरी शिवसेनेने मारलेली मुसंडी त्यांना विचार करायला लावणारी आहे.