Whale vomit smuggling case File Photo
सातारा

Whale vomit smuggling case: व्हेल मासा उलटी तस्करीप्रकरणी महाबळेश्वरमध्ये 7 जणांना अटक

वन विभागाचा वेण्णा लेक परिसरात छापा; 5 किलो 304 ग्रॅम उलटी जप्त

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहर परिसरातील वेण्णा लेक व मेटतळे परिसरात अंबर ग्रीस (व्हेल माशाची उलटी) तस्करी प्रकरणी महाबळेश्वर वन विभागाने मोठी कारवाई करत 5 किलो 304 ग्रॅम अंबर ग्रीस जप्त केले आहे. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. या दुर्मीळ वस्तूची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अतुल अशोक विश्वासराव (रा. ठाणे), आकाश शामसुंदर धुरी (रा. मालवण, जि. सिंधुदुर्ग), एक्झम क्लेमेंट फर्नांडिस (रा. मालवण), हितेंद्र मनोहर शेट्ये (रा. लालबाग-परळ, मुंबई), कौस्तुभ मिलिंद प्रभू (रा. धनकवडी, पुणे), मोहन हरिभाऊ पाटील (रा. भावेघर, ठाणे) आणि विल्सन झुजे फर्नांडिस (रा. मालवण) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दि. 5 मार्च रोजी सहायक वनसंरक्षक, प्रदीप रौंदळ यांना महाबळेश्वर परिसरात अंबर ग्रीस तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक वनसंरक्षक पथक, महाबळेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच संरक्षण व अतिक्रमण विभागाच्या पथकाने वेण्णा लेक आणि मेटतळे परिसरात सापळा रचून तीन वाहनांची तपासणी केली.

तपासणीदरम्यान एका वाहनामध्ये व्हेल माशाच्या उलटीसारखा दिसणारा पदार्थ आढळून आला. त्याचे वजन 5 किलो 304 ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. अंबर ग्रीस हा पदार्थ वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या अनुसूची-1 मध्ये समाविष्ट असून त्याची विक्री किंवा अवैध वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. या गुन्ह्यास सात वर्षांपर्यंत कारावास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड अशी तरतूद आहे. संशयित सात जणांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमनुसार वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात इतर संशयित आरोपींचा सहभाग आहे का? याबाबतचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते करत आहेत.

उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, सुनील लांडगे, वनपाल तुकाराम निकम, बाबू मराठे, देवेंद्र पवार, अविनाश गवळी यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT