म‌’श्वर पर्यटनस्थळी ऐन हंगामात ‌‘बत्ती गुल‌’ 
सातारा

Mahabaleshwar Tourism : म‌’श्वर पर्यटनस्थळी ऐन हंगामात ‌‘बत्ती गुल‌’

महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे स्थानिकांसह पर्यटक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : देश-विदेशातील पर्यटकांच्या पसंतीचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या उन्हाळी हंगामामुळे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी आणि आता वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पर्यटकांसह स्थानिक व्यापारी व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटन हंगामात विजेचा लपंडाव सुरु झाला असून सायंकाळी मुख्य बाजारपेठेत पर्यटकांची गर्दी वाढताच वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील अनेक दुकाने अंधारात जात असून काही व्यापाऱ्यांना इन्व्हर्टर तर काहींना पर्यायी दिव्यांचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या उन्हाळी हंगामामुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची रेलचेल वाढली असतानाच दिवसातून अनेक वेळा वीज खंडित होत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

विशेषतः सायंकाळच्या वेळेत खरेदीसाठी येणाऱ्या पर्यटकांना अंधाराचा सामना करावा लागत असून स्थानिक व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. हॉटेल व्यवसायिक, दुकानदार आणि पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांनी वारंवार होणाऱ्या वीजखंडितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मागील उन्हाळी, पावसाळी व दिवाळी हंगामातही अशाच समस्यांना सामोरे जावे लागले होते. मात्र अद्यापही प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नसल्याची खंत व्यक्त होत आहे. जानेवारी ते मार्च या तुलनेने कमी गर्दीच्या काळात वीजपुरवठा सुरळीत राहतो; मात्र एप्रिल-मे, जून-जुलै तसेच नोव्हेंबर-डिसेंबर या पर्यटन हंगामात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचा आरोप स्थानिकांतून होत आहे.

मुख्य पर्यटन हंगामात सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असून व्यवसायावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. महावितरणने तातडीने याची दखल घेणे गरजेचे आहे.
-सुनील वाडकर, हॉटेल व्यावसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT