महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. विविध ठिकाणी पडझड आणि नुकसानीच्या घटना घडत आहेत. बुधवारी सकाळी महाबळेश्वर–तापोळा या मुख्य डांबरी रस्त्याच्या बाजूच्या साईडपट्टीला तब्बल ३० मीटरपर्यंत भलीमोठी भेग पडून रस्ता भेगाळला. त्यामुळेच या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या मार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत.
दोन वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या महाबळेश्वर–तापोळा रस्त्यावर पालिकेच्या कारवी आळी येथील कचरा डेपोपासून काही अंतरावर रस्ता खचला. महाबळेश्वरहून तापोळा परिसराकडे जाणारा हा एकमेव मुख्य मार्ग असल्याने चिंता व्यक्त होत आहे.घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, अधीक्षक अभियंता विश्वनाथ सातपुते, उपअभियंता अजय देशपांडे आणि शाखा अभियंता शिवप्रसाद धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
रस्त्याला धोका निर्माण होऊन वाहतूक पूर्णपणे बंद होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात तातडीची संरक्षणात्मक कामे सुरू करण्यात आली आहेत. पावसाळा संपल्यानंतर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता अजय देशपांडे यांनी दिली.
याचदरम्यान, तालुक्यातील दुर्गम आढाळ गावातील जि. प. प्राथमिक शाळेचे छत जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उडून गेले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर महाबळेश्वर बाजारपेठेजवळील मुख्य एल. सी. डिसुझा रस्त्यावर एका हॉटेलनजीक झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.