Superstition Case 
सातारा

Mahabaleshwar Superstition Case : ज्ञानमंदिरासमोरच अंधश्रद्धेचा बाजार?

पौर्णिमा-अमावस्येला लिंबू, नारळ, काळे धागे अन् उताऱ्याचे साहित्य

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गिरिस्थान नगरपरिषदेच्या मराठी शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात पौर्णिमा व अमावस्येच्या काळात अंधश्रद्धेशी संबंधित वस्तू आढळून येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेच्या परिसरातच अशा वस्तू टाकल्या जात असल्याने पालक व नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहेत. पालिका व पोलिस प्रशासनाने याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पौर्णिमा-अमावस्येच्या रात्री या परिसरात लिंबू, नारळ, मिरची, गुलाल, काळे धागे, टाचण्या तसेच उताऱ्याशी संबंधित साहित्य आढळते. अंधाराचा फायदा घेऊन सार्वजनिक ठिकाणी अशा वस्तू टाकल्या जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. शाळेसमोरील परिसरात विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अशा वस्तू आढळल्याने लहान मुलांमध्ये भीती किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी वारंवार असे प्रकार होत असतील तर त्यामागे नेमके कोण आहे, याची चौकशी करण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या अमानुष, अनिष्ट व शोषण करणाऱ्या प्रथांना प्रतिबंध करण्यासाठी २०१३ चा कायदा लागू आहे. मात्र, कोणतीही वस्तू आढळली म्हणून एखाद्या व्यक्तीवर थेट आरोप न करता प्रशासनाने वस्तुस्थितीची चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करणे आवश्यक आहे. पालिका व पोलिस प्रशासनाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून वस्तू टाकणाऱ्यांचा शोध घ्यावा.

तसेच पौर्णिमा व अमावस्येच्या काळात संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणारे साहित्य आढळल्यास ते तातडीने हटवावे, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT