महाबळेश्वर : महाबळेश्वर पर्यटनस्थळी भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून मागील काही दिवसात तब्बल 22 जणांना चावा घेतला आहे. अशा रुग्णांची महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात अक्षरशः रिघ लागली होती. भुंकणे, अंगावर येणे, दुचाकींचा पाठलाग करणे , अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
महाबळेश्वरमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिक, महिला, लहान मुलांना रस्त्याने ये-जा करणे देखील मुश्किल झाले आहे. कुत्र्यांच्या झुंडींंमुळे सामान्य नागरिकांसह शाळकरी विद्यार्थी व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठ, एस टी स्थानक परिसर व गल्लीबोळात कुत्र्यांची टोळकी मोकाटपणे वावरत आहेत. शाळेत जाणारे विद्यार्थी, पहाटे फिरण्यासाठी जाणारे नागरिक, पर्यटकांसह रात्रीच्या वेळी आपापली कामे आटपून घरी जाणारे नागरिक यांना या मोकाट कुत्र्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पादचाऱ्यांवर गुरगुरणे, भुंकणे, वाहनचालकांच्या मागे धावणे असे प्रकार सर्रास सुरु आहेत.
शहरातील वर्दळीच्या ठिकाणी, मुख्य चौकांसह एसटी स्थानक परिसर, मरी पेठ, कोळी आळी, स्कुल मोहल्लासह बाजारपेठेत या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्यावेळी भुंकणे व विव्हळण्याच्या आवाजाने अनेकांची झोपमोड देखील होत आहे.
अनेकदा नागरिकांसह पर्यटकांकडूनदेखील भटक्या कुत्र्यांना बिस्किटे व चपात्या टाकण्यात येतात. त्यामुळे देखील या कुत्र्यांची संख्या वाढली असल्याचे दिसते. गेल्या काही महिन्यांपासून हा त्रास सुरु असून या मोकाट कुत्र्यांना आवर घालावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
महाबळेश्वर शहरात गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल 22 जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला असल्याची माहिती मिळाली. ग्रामीण रुग्णालयात या रुग्णांची रिघ लागली होती. संबंधित कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम हाती घ्यावी. महाबळेश्वर पालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करावे,अशी नागरिकांची मागणी आहे.
दरम्यान, शहरात ऐन हंगामात देखील गुरं फिरताना पहावयास मिळत असतात. नागरिकांसह पर्यटकांना रस्त्यावर पडलेल्या या जनावरांच्या शेण व घाणीमुळे दुर्गंधी पसरत असून नाक धरून चालावे लागत आहे. याप्रश्नी पालिकेच्यावतीने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.