महाबळेश्वर : गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी महाबळेश्वरात पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. त्यातच शालेय सहलींनी प्रेक्षणीय स्थळांसह मुख्य बाजारपेठ गजबजून गेली आहे. 8 ते 9 अंशांपर्यंत घसरलेले तापमान, वेण्णालेक आणि लिंगमळा परिसरातील तीव्र थंडी यामुळे पर्यटक उबदार कपडे परिधान करून फिरताना दिसत आहेत.
थंडीचे प्रमाण वाढल्याने शहरात गारठा वाढला आहे. तापमान घसरू लागल्याने वेण्णालेक व लिंगमळा परिसरात हॉटेलबाहेर शेकोट्या पेटवून पर्यटक ऊब घेताना दिसत आहेत. बाजारपेठेत स्वेटर, शाल, जॅकेट, मफलर, कानटोपी यांना मोठी मागणी आहे. बाजारात लालचुटुक स्ट्रॉबेरी दाखल होऊ लागली असून दर सुमारे 300 ते 350 रुपये किलो आहे. शालेय व महाविद्यालयीन सहली पुन्हा सुरू झाल्याने वेण्णालेक, प्रतापगड, क्षेत्र महाबळेश्वर परिसर दिवसातून अक्षरशः विद्यार्थ्यांनी फुलून जात आहे.
रोज सहासात शाळांची सहल येत असून स्थानिक दुकानदारांच्या व्यापाराला मोठी चालना मिळत आहे. ऐन थंडीत महाबळेश्वरमध्ये सध्या स्पाइरल (स्प्रिंग) पोटॅटोची मोठी क्रेज आहे. बटाट्याचे स्पायरल काप करून तळून त्यावर पेरीपेरी व विविध मसाले तसेच मेयोजीस सॉस वापरून दिला जाणारा हा प्रकार 100 ते 200 रुपयांत उपलब्ध असून लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना भुरळ घालतो.