Panchgani-Mahabaleshwar tourism Pudhari
सातारा

Panchgani-Mahabaleshwar tourism: सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर-पाचगणी बहरले

वेण्णालेक, टेबललँड व बाजारपेठेत वर्दळ : आल्हाददायक वातावरणाचा अनुभव

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर/पाचगणी : महाराष्ट्राचे नंदनवन असलेले पाचगणी व महाबळेश्वर सुट्ट्यांमुळे बहरू लागले आहे. परीक्षांचा माहोल संपल्यावर आता पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. सकाळी जरी थोडा उष्मा जाणवत असला तरी सायंकाळी व रात्री आल्हाददायक वातावरणाचा अनुभव पर्यटक घेत आहेत. विशेषत: वेण्णा लेक, क्षेत्र महाबळेश्वर, विविध पॉईंटस्‌‍, महाबळेश्वर बाजारपेठ, टेबल लँड परिसर, पारशी पॉईंटवर गर्दी होत आहे. आल्हाददायक वातावरणाने पर्यटक आनंदी होत आहेत.

महाबळेश्वरचे मुख्य आकर्षण असलेल्या वेण्णालेक व परिसर, पुरातन श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरांसह पाचगणीतील टेबल लँड, सिडने पॉईंट, पारशी पॉईंटसह अन्य निसर्गरम्य ठिकाणांवर पर्यटकांची रेलचेल वाढली असून उन्हाळी हंगामाला प्रारंभ झाला आहे. महाबळेश्वर पाचगणी मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागत आहे. वेण्णालेकसह व पाचगणी शहरात वाहतूक कोंडी होत असल्याने पर्यटक हैराण होत आहेत.

शुक्रवारी सायंकाळपासून महाबळेश्वर व पाचगणी पर्यटनस्थळी पर्यटकांची इनकमिंग सुरु झाली आहे. मुंबई पुणेसह विविध ठिकाणांहून पर्यटक दाखल होत आहेत. सायंकाळी वातावरणात गारवा जाणवत असल्याने पर्यटक सायंकाळीच फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. लेक नौकाविहार व चौपाटीवर मका कणीस मका फ्रँकी अश्या गरमागरम पदार्थांवर ताव मारण्यासोबतच आलेदार चहा, भेळ, पाणीपुरी तसेच आईसगोळा, स्ट्रॉबेरी विथ क्रीम सारख्या थंडगार पदार्थांची चव चाखताना पर्यटक दिसत आहेत.

हौशी पर्यटक वेण्णालेकवर घोडेसवारीचा आनंद लुटताना दिसत आहेत. बालचमूंसाठी विविध गेम्सची धूम आहे येथील प्रसिद्ध केट्स पॉईंट, ऑर्थरसीट पॉईंट, किल्ले प्रतापगड, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, लॉडविक पॉईंटवर पर्यटक गर्दी करत आहेत. तर पाचगणी शहरातील सिडने पॉईंट, पारशी पॉईंट, टेबल लँड, भिलार वॉटर फॉल, मॅप्रो गार्डन येथे गर्दी होत आहे.

महाबळेश्वर, पाचगणी व वाहतूक कोंडी हे समीकरण किती घट्ट आहे याचा प्रत्यय पर्यटकांना येत आहे. पोलीस प्रशासनाच्या अपुऱ्या नियोजनामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास पर्यटकांना बसत आहे. विशेषत: महाबळेश्वरमध्ये कोंडी अधिक असल्याने नागरिक वैतागून जात आहेत. दिवसेंदिवस महाबळेश्वर व पाचगणीतील पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होवू लागली आहे. त्या तुलनेत सुविधा मिळणार नसतील तर पर्यटकांची संख्या रोडावण्याची भीती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT