महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जमीन खचली. तसेच शेती व रस्त्यांना तडे गेले आहेत. मातीचा मलबा वाहून आल्याने तीन कुटुंबांतील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जमीन खचल्याने गावातील पाण्याच्या टाकीला धोका निर्माण झाला आहे. या घटनेनंतर महसूल विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यात शुक्रवार सकाळपर्यंत तब्बल १० इंच पावसाची नोंद झाली.
महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी रात्रभर धुवांधार पाऊस बरसला, तर शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. या पावसाने महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील नावली या गावामध्ये दरड कोसळली. मातीचा भराव वाहून गेल्यामुळे नुकसान झाले आहे. याबचरोबर काही घरांना तडे गेल्याने संबंधित कुटुंबांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.
सततच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता, तर शहराचा वीजपुरवठ्यातदेखील जोरदार वारे वाहत असल्यामुळे व्यत्यय येत होता. जमिनीची पकड कमकुवत झाल्याने विविध ठिकाणी भूभाग खचण्यास सुरुवात झाली. त्याचा परिणाम शेती, निवासी घरे आणि गावातील अंतर्गत रस्त्यांवर झाला आहे.
नावली गावातील घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. तसेच भूगर्भ तज्ज्ञांकडूनही या परिसराचा अभ्यास केला जाणार आहे. दरम्यान, परिसरात अद्यापही मुसळधार पाऊस सुरू असल्याने आणखी जमीन खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, धोकादायक भागात जाणे टाळण्याचे तसेच अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.