सातारा

Mahabaleshwar: मेटतळेत धनिकाकडून वृक्षतोड, अवैध उत्खनन

पाच लाखांचा दंड : महसूलकडून गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात नियमांना हरताळ फासून बेकायदेशीर वृक्षतोड, उत्खनन आणि अनधिकृत बांधकामांचे प्रकार वाढत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. मेटतळे येथे अनधिकृतपणे वृक्षतोड व उत्खनन केल्याप्रकरणी धनिकावर गुन्हा दाखल झाला आणि पाच लाखांचाही दंड ठोठावला.

महाबळेश्वर ते प्रतापगड मुख्य रस्त्यालगत मेटतळे येथील सर्व्हे नं. 11/16 व 11/17 मधील जागेत बाहेरील एका धनिकाकडून मोठे पत्र्याचे शेड उभारून आत मोठ्या प्रमाणावर उत्खनन व वृक्षतोड केल्याचे उघड झाले. पत्रकारांनी आवाज उठवल्यानंतर महसूल विभागाने या घटनेची पाहणी केली. यामध्ये एकूण 122 झाडे तोडल्याचे आढळून आले. यामध्ये खडसलेली 69, तोडलेली 27 अणि गाडलेल्या 26 झाडांचा समावेश आहे. वृक्षतोड झाल्यानंतर प्रशासनाने संबंधित मिळकतधारकास दंडाची नोटीस बजावली. यानुसार 4 लाख 89 हजार 100 रुपयांचा दंड ठोठावला. तसेच, पंचनामा करून संबंधित धनिक राजेंद्र गोविंद सुर्वे याच्यावर गुन्हा दाखल केला.

मुख्य रस्त्यालगत एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन व वृक्षतोड होत असताना प्रशासनाचे लक्ष का गेले नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. तहसीलदारांकडून शेती सुधारणा व सपाटीकरणासाठी परवानगी घेतली असताना अटींचे उल्लंघन करून वृक्षतोड केली. याकडे तलाठी व संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केले, याबाबत संशय व्यक्त होत आहे.

पत्रकारांच्या पाठपुराव्यानंतर तलाठी मनीषा भोसले यांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, संबंधित जमीनधारकाने विनापरवाना जांभूळ, हिरडा, अंजन, भोमा आदी झाडांची तोड केली. महाबळेश्वरमध्ये पर्यावरण संरक्षणासाठी कडक नियम असून, बांधकामांवरही निर्बंध आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हेरिटेज व उच्चस्तरीय निरीक्षण समित्या कार्यरत आहेत. तरीही नियमांतील पळवाटांचा आधार घेऊन ‌‘सेटिंग‌’च्या माध्यमातून बेकायदेशीर बांधकामे व वृक्षतोड सुरू असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT