Mahabaleshwar : महाराष्‍ट्राचं मिनी काश्मीर धुक्‍यात हरवलं, रिमझिम पावसाच्या सरींनी पर्यटक सुखावले File Photo
सातारा

Mahabaleshwar : महाराष्‍ट्राचं मिनी काश्मीर धुक्‍यात हरवलं, रिमझिम पावसाच्या सरींनी पर्यटक सुखावले

कडाक्याची थंडी अन दाट धुक्यासह, रिमझिम पावसाची बरसात अशा अल्‍हाददायक वातावरणामुळे महाराष्‍ट्राचे नंदनवन असलेले महाबळेश्वर पर्यटकांनी बहरले.

पुढारी वृत्तसेवा

'Mahabaleshwar' lost in fog, drizzle brings joy to tourists

सातारा : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राचे नंदनवन, प्रमुख पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी ऐन उन्हाळी हंगामात पर्यटनास आलेल्या पर्यटकांना पावसाळी वातावरणाची जणू अनुभूती मिळत आहे. अशा धुंद वातावरणाने पर्यटक बेधुंद झाले आहेत.

कडाक्याची थंडी अन दाट धुके, अधूनमधून पावसाची रिमझिम बरसात आणि सोबतीला अद्वितीय निसर्गसौंदर्याने महाबळेश्वर पर्यटनस्थळाच्या सौंदर्यास चारचाँद लागले आहेत. अशा या वातावरणाचा मनमुराद आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत. दाट धुक्यात हरवलेले वेण्णालेकसह सर्व प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांची रेलचेल वाढली आहे.

महाबळेश्वर वासियांसाठी एप्रिल व मे महिन्याचा हंगाम आर्थिकदृष्ट्या महत्वाचा मानला जातो. या हंगामामध्ये लाखोंच्या संख्येने पर्यटक पर्यटनास येतात. प्रामुख्याने याच हंगामामध्ये सुट्ट्यांमुळे या पर्यटनस्थळी पर्यटकांची हमखास गर्दी पाहावयास मिळते. गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर पर्यटनस्थळी अवकाळी पावसामुळे बदललेल्या वातावरणाने निसर्ग सौंदर्य खुलले असून दाट धुके अधूनमधून पावसाची बरसात व हिरवागार निसर्ग सोबतच सुखद गारवा व आल्हाददायक वातावरण पर्यटकांना खुणावत आहे.

हजारो पर्यटक या पर्यटन नगरीत दाखल होत आहेत. येथील निसर्गसौंदर्य, बदलणाऱ्या वातावरणाचा अनुभव पर्यटक घेत आहेत. महाबळेश्वरच्या सर्व प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. येथील सर्वात उंच असलेल्या विल्सन पॉईंट येथे सुटणाऱ्या थंडगार वाऱ्याचा अनुभव घेण्यासाठी व निवांतपणासाठी पर्यटकांची पाऊले येथे वळताना दिसत आहेत.

महाबळेश्वरची शान असलेल्या ऑर्थरसीट पॉईंटसह पौराणिकदृष्ट्या महत्वाचे असलेले श्रीक्षेत्र महाबळेश्वर, शूटिंगसाठी प्रसिद्ध असलेला केट्स पॉईंट तसेच पश्चिम घाटाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी प्रसिद्ध लॉडविक व एलिफंट हेड सोबतच सायंकाळी मुंबई पॉईंट येथे सुर्यास्थाचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.

ऐतिहासिक किल्ले प्रतापगड व शिवकालीन खेडेगाव, मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून भेट देत आहेत. येथील सर्वच प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची रेलचेल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT