सातारा

Mahabaleshwar Golf Course: अखेर ‘गोल्फ कोर्स’वरील अनधिकृत शेड जमीनदोस्त

दै. ‘पुढारी’च्‍या लढ्याला यश : पालिका-तहसील कार्यालयाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वरमधील हेरिटेज मिळकत असणार्‍या गोल्‍फ कोर्स मैदानावर झालेल्‍या वृक्षतोड, उत्‍खनन व अनधिकृत शेड उभारणीविरोधात दै. ‘पुढारी’ने निर्भीडपणे उभारलेल्‍या लढ्याला अखेर यश मिळाले आहे.  ‘द क्‍लब’ व्‍यवस्‍थापनाकडून उभारलेल्‍या अनधिकृत शेड व कुंपणावर मंगळवारी पालिका व तहसील कार्यालयाने संयुक्‍त कारवाई करत हातोडा चालवला. या कारवाईमुळे ‘द क्‍लब’ व्‍यवस्‍थापनाने केलेली बेकायदेशीर कामे नेस्‍तनाबूत झाली.

महाबळेश्‍वरमधील ‘द क्‍लब’ व्‍यवस्‍थापनाच्‍या ताब्‍यात असणार्‍या गोल्‍फ कोर्स मैदानात वृक्षतोड, उत्‍खनन व अनधिकृतपणे शेड व कंपाऊंडची उभारणी करण्‍यात आल्‍याची तक्रार बॉम्बे एन्व्हायरमेंटल ॲक्‍शन ग्रुपचे प्रकल्प अधिकारी अनिल पंडित यांनी तहसीलदार व पालिकेकडे केली. मात्र, यावर कार्यवाही न झाल्‍याने प्रांताधिकार्‍यांकडे गार्‍हाणे मांडले. यानंतर प्रांताधिकारी डॉ. खरमाटे यांनी स्‍थळ पाहणी केली असता, यामध्‍ये वृक्षतोड व अनधिकृतपणे शेड उभारणी झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. हा विषय दै. ‘पुढारी’ने प्रथम समोर आणून ‘द क्‍लब’ व्‍यवस्‍थापनाचा गैर कारभार उघडा पाडला होता.

दै. ‘पुढारी’ने यावर आवाज उठवल्‍यानंतर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील यांनी याची दखल घेत या अनुषंगाने कारवाई करण्‍याचे आदेश दिले. त्‍यानुसार घटनेचा पंचनामा करून पालिकेच्‍या वतीने ‘­द क्‍लब’ व्‍यवस्‍थापनाच्‍या चेअरमन श्रीमती मनीषा गोखले-शहा, सचिव लेफ्ट. कर्नल (निवृत्त) गौतम नंदी व सुहास पार्टे या तिघांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. यानंतर पालिकेच्या वतीने अनधिकृत शेड व कंपाऊंड हटवावे अन्‍यथा ते पाडले जाईल, असा असा इशारा दिला होता.

मात्र, या नोटिसीनंतरही दहा दिवस झाल्‍यावरही कारवाई होत नव्‍हती. त्‍यामुळे पालिका द क्‍लब व्‍यवस्‍थापनाला ही कारवाई दडपण्‍यासाठी वेळ देत आहे का? मुख्‍याधिकार्‍यांचे साटेलोटे आहे का? असे सवाल करत मुख्‍याधिकार्‍यांची भूमिका संशयास्‍पद या मथळ्‍याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. तहसीलदार सचिन मस्‍के यांनीही मुख्‍याधिकार्‍यांना कारवाई करण्‍याचे पत्र दिले. परंतु, मुख्‍याधिकार्‍यांनी नोटीस देऊनही कारवाई करण्‍यास टाळाटाळ केली. यामुळे शेड व कंपाऊंड हटवण्‍यासाठी होणार्‍या पुढील कारवाईला ब्रेक लावला होता. यावर दै. ‘पुढारी’ने वारंवार आवाज उठवला होता.

याचदरम्यान गोल्फ कोर्स प्रकरणाची दखल उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत यामध्‍ये कुणाचीही गय केली जाणार नसल्‍याचे सांगितले होते. यानंतर पुन्‍हा एकदा जिल्‍हाधिकार्‍यांनी तहसीलदार व मुख्‍याधिकार्‍यांना कडक शब्‍दात कारवाई करण्‍याच्‍या सूचना केल्‍या. यानंतर अखेर मुख्‍याधिकार्‍यांना कारवाई करावी लागली.

मंगळवारी दुपारी पालिका आणि तहसील कार्यालयाच्‍या वतीने संयुक्‍त मोहीम राबवत गोल्फ कोर्स मैदाननजीक उभारलेले पत्रा शेड जेसीबीच्‍या सहाय्‍याने हटवण्‍यात आले. तसेच मैदानाच्‍या चहूबाजूने उभारलेले कंपाऊंडही रातोरात हटवण्‍यात आले. यामुळे दै. ‘पुढारी’च्‍या लढ्याला अखेर यश आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT