महाबळेश्वरमध्ये धुवाँधार पाऊस सुरू असल्याने बाजारपेठेत असा शुकशुकाट जाणवत आहे. Pudhari Photo
सातारा

Mahabaleshwar Rain | महाबळेश्वरात पावसाचे अर्धशतक; पर्यटनाला उधाण

जूनमध्येच 50 इंचाचा टप्पा पार; वेण्णालेक परिसरात दाट धुक्याची चादर

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : पर्यटनस्थळ महाबळेश्वरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, शुक्रवारी सकाळीच पावसाने 50 इंचाचा टप्पा ओलांडला आहे. दरवर्षी जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात पूर्ण होणारे पावसाचे अर्धशतक यंदा जून महिन्यातच पूर्ण झाल्याने निसर्गप्रेमी आणि पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीला काहीशी उघडीप दिल्यानंतर पावसाने दुसर्‍या आठवड्यापासून जोर धरला. या दमदार पावसामुळे शहराची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. दि. 1 ते 28 जून या कालावधीत महाबळेश्वरमध्ये 1341 मिमी म्हणजेच 52.79 इंच विक्रमी पावसाची नोंद झाली आहे, जी गतवर्षीच्या तुलनेत दीडपट अधिक आहे. या पावसामुळे हवामानात सुखद गारवा निर्माण झाला असून, सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली आहे.

या धुंद वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने महाबळेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. वेण्णा तलाव परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असून, अनेकजण दाट धुक्यात सेल्फी काढण्याचा आणि नौकाविहाराचा आनंद लुटत आहेत. मुख्य बाजारपेठेतही उबदार कपडे, रेनकोट आणि छत्री खरेदीसाठी पर्यटकांची झुंबड उडत आहे. एकंदरीत, धुवाँधार पावसाने महाबळेश्वरमधील वर्षा पर्यटनाला खरा बहर आणला आहे.

लिंगमळा धबधबा फेसाळला

पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेला प्रसिद्ध लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. या संपूर्ण परिसरात हिरवी शाल पांघरली असल्याचे द़ृश्य पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहेत. याचबरोबर आंबेनळी घाटामधील धबधबे देखील पर्यटकांचा खुणावत आहेत. धुवांधार पाऊस व धुक्याची अनुभूती घेण्यासाठी पर्यटक दाखल होत आहेत. वीकएंड ला पर्यटकांची लिंगमळा धबधबा, वेण्णालेक परिसर, केट्स पॉईंट लॉडविक पॉईंटसह विविध पॉईंटकडे पावले वळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT