सातारा

Mahabaleshwar Rain: महाबळेश्वरमध्ये पावसाची ‘डबल सेंच्युरी’

वीकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी : वेण्णालेकसह लिंगमळा धबधबा परिसर बहरला

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये पावसाची डबल सेंच्युरी झाली असून दि. १ जून ते दि. ९ ऑगस्ट अखेर २०१.२५ इंच म्हणजेच ५१११.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वीकेंडच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांच्या गर्दीने महाबळेश्वर बहरून गेले आहे. दाट धुके, कडाक्याची थंडी आणि रिमझिम पावसाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी शनिवारी पर्यटकांनी महाबळेश्वरकडे मोठ्या संख्येने धाव घेतली. प्रमुख आकर्षण असलेल्या वेण्णालेक परिसरात पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने काही काळ वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली.

महाबळेश्वर व परिसरात गेली दिड महिने अव्याहतपणे बरसणाऱ्या पावसाने नुकताच आपली‘डबल सेंचुरी’ साजरी केली आहे. सध्या या पर्यटनागरीमध्ये पर्यटकांची रेलचेल अनुभवायास मिळत असून पुढील काही दिवसात वीकएंड व १५ ऑगस्टसह लागून सुट्ट्यांमध्ये देखील पर्यटकांची मोठी गर्दी पर्यटनासाठी होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नवदाम्पत्य तरुण तरुणींसह परराज्यातून पावसाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे.

पोंची रेनकोट परिधान करून गरमागरम अलेदार चहा, महाबळेश्वराचे प्रसिद्ध चणे, चिक्की, चप्पल खरेदीसह गरम मॅग्गी, पॅटिस, मका कणिसावर खवय्ये ताव मारताना दिसत आहेत. येथील आल्हाददायक वातावरणाची अनुभूती पर्यटक घेत आहेत. वेण्णालेक परिसरात दाट धुक्यात पर्यटक फोटो सेल्फी घेताना दिसत असून चौपाटीवर खवय्ये अनेकविध खाद्यपदार्थांवर ताव मारत आहेत.

रिमझिम पावसात घोडे सवारीसाठी देखील पर्यटकांची गर्दी होत आहे. येथील पावसाळी पर्यटकांचे आकर्षक असलेल्या लिंगमळा धबधबा परिसर पर्यटकांना खुणावत असून हिरव्यागार डोंगररांगांमधून कोसळणारे, फेसाळणारे धबधबे आणि दाट धुक्याचे वातावरण मनाला शांतता आणि आनंद देत आहे. वेण्णा तलावाच्या पाण्याच्या प्रवाहावर मेटगुताड येथे साकारण्यात आलेला मिनी भुशी डॅम पर्यटकांच्या पावसाळी आकर्षणाचे प्रमुख ठिकाण बनला असून हजारो पर्यटक येथे दाखल होत मज्जा लुटत आहेत.

पुढील आठवड्यामध्ये वीकएंडसह १५ ऑगस्ट अशा लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी वाढणार असून त्याअनुषंगाने स्थानिक प्रशासनाने तयारी करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT