सातारा

Mahabaleshwar: ऐन उन्हाळ्यात धुक्यात हरवले महाबळेश्वर

बाजारपेठेसह परिसरात सायंकाळी आल्हाददायक वातावरण

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : राज्यातील इतर भागांत उन्हाची लाट असतानाच, थंड हवेचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वर पर्यटन स्थळावरील वातावरणात पहाटे व सायंकाळी मोठा बदल पर्यटकांना अनुभवायास मिळत असून ऐन उन्हाळ्यात तापमान घसरल्यामुळे येथील प्रसिद्ध वेण्णा लेकसह डोंगर-खोऱ्यांमध्ये दाट धुक्याची दुलई पसरली आहे.

महाबळेश्वरची मुख्य बाजारपेठ सायंकाळी धुक्यात हरवल्याचे चित्र पाहावयास मिळत असून या बदलेल्या वातावरणाचा पर्यटक मनमुराद आनंद घेत आहेत. दररोज हजारो पर्यटक पर्यटनासाठी या पर्यटनगरीमध्ये दाखल होत असून येथील विविध प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. महाबळेश्वर पर्यटन स्थळाच्या उन्हाळी हंगामास प्रारंभ झाला असून पर्यटकांची चांगलीच रेलचेल आहे.

एकाबाजूला सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाची प्रचंड तीव्रता जाणवत असताना महाबळेश्वर पर्यटनटस्थळी मात्र उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना अचानक हिवाळ्यासारखा अनुभव मिळत आहे. प्रामुख्याने शनिवार, रविवार या वीकएंडला देखील पर्यटक मोठ्या संख््येने येथे दाखल होत पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बदलेल्या या थंड वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी होत आहे.

महाबळेश्वरचे प्रमुख आकर्षण असलेल्या नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णा लेक व परिसरात पर्यटकांची चांगलीच रेलचेल असून नौकाविहार, घोडेसवारीचा आनंद पर्यटक घेत आहेत. महाबळेश्वर पदार्थांची चव चाखताना अनेक पर्यटक दिसत असून येथील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांसह श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, तापोळा रस्त्यावरील नवीन विज्ञानगड पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून जात आहेत. मुख्य बाजरपेठेत सायंकाळी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी होते. अशावेळी सायंकाळी धुके पसरल्यामुळे पर्यटकांना एन उन्हाळी हंगामामध्ये हिवाळ्याची अनुभूती मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT